सोलापूर जिल्ह्यातील घटना... अपहरण करून महाविद्यालयीन विद्यार्थ्याला टाकले घाटात !
बारामती / टेंभुर्णी : माढा तालुक्यातील वेणेगाव येथील एका महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करून, त्याला मारून आणि गळा आवळून माळशेज येथील घाटात फेकून दिल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीजवळ असलेल्या वेणेगाव येथील २३ वर्षाचा नितीन बाळासाहेब कदम याचे मोटार विक्रीच्या जुन्या व्यवहारातून अपहरण झाले आणि मोठ्या थरारक प्रसंगाला नितीनला सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणात टेंभुर्णीच्या तराळवस्ती येथे राहणाऱ्या मनोज उर्फ बंडू रामदास मुळे याच्यासह सहा जणांच्या विरोधात बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बारामती येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या नितीन कदम याचे अपहरण प्रकरण अत्यंत थरारक असून सुदैवाने त्याचा प्राण वाचला आहे.
नाट्यमय अपहरण
एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने नितीनचे अपहरण करण्यात आले. नितीन हा जीममध्ये व्यायाम करीत होता त्याचवेळी मनोज उर्फ बंडू रामदास मुळे आपल्या पाच साथीदारासह तेथे आला. 'तू एका मुलीची छेड काढली आहेस, भिगवण पोलीस स्टेशनला चल' असे हे आरोपी नितीनला म्हणाले. अचानक झालेल्या या आरोपाने नितीन गोंधळून गेला. आपण कुठल्याही मुलीची छेड काढली नसल्याचे तो सांगत राहिला. त्याचे काहीही ऐकून न घेतला नितीनला बळजबरीने स्कर्पिओ गाडीत बसवले आणि गाडी भिगवणच्या दिशेने निघाली.
सह्यासाठी बळजबरी !
नितीन हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असला तरी त्याच्याकडे एक स्कर्पिओ गाडी होती. एम एच ४२ एक्क्ष ९२९६ या क्रमांकाची त्याची स्कर्पिओ गाडी त्याने मनोज उर्फ बंडू रामदास मुळे याला विकली होती. नितीनला घेवून निघालेली गाडी भिगवण पोलीस ठाण्यात गेलीच नाही तर ती करमाळा रस्त्याच्या बाजूने नेण्यात आली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नितीनकडील मोबाईल काढून घेण्यात आला आणि गाडी नावावर करून घेण्यासाठी टी टी फॉर्मवर सह्या करण्यास नितीनला सांगण्यात आले.
पैसे दिले नव्हते !
नितीन कदम याने आपली स्कार्पिओ मुळे याला विकली होती पण त्याने व्यवहार ठरल्याप्रमाणे पैसे दिलेले नव्हते. संपूर्ण रक्कम न मिळाल्याने नितीन टी टी फॉर्मवर सही करायला तयार नव्हता. नितीन याने मुळे याच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाणे आणि सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक याना तक्रारी अर्ज दिले होते. त्यामुळे हा मुळे त्याच्यावर चिडून होता आणि तो नितीनला धमकावत होता.
जबर मारहाण !
नितीन याने सह्या करण्यास नकार देताच लोखंडी टॉमी उचलून नितीनच्या डोक्यात घालण्यात आली. आरोपींची जबरदस्ती करीत टी टी फॉर्मवर नितीनचा अंगठा उठवला आणि गाडीतून खाली उतरले. नितीनचे हात दोरीने बांधण्यात आले आणि त्याच्या चेहऱ्यावर टॉवेल टाकला गेला. नितीनला मारून टाकून त्याचा मृतदेह माळशेज घाटात टाकून देऊ अशी चर्चा त्यांच्यात सुरु होती.
घाटात फेकले !
नितीन याला मारहाण झाल्याने त्याची अवस्था बिकट झाली होती त्यातच मुळे याने एका रस्सीने नितीनचा गळा आवळला. यात नितीन बेशुद्ध झाला. ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटात नेले आणि तेथे नितीनला फेकून देण्यात आले. आपसातील चर्चेप्रमाणे त्यांनी या घाटात आणले होते. नितीन याचा गळा आवळल्याने मृत्यू झाला असेल अशाच भ्रम आरोपींचा झाला असावा. त्यामुळेच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटात नेवून त्याला फेकून दिले.
शुद्धीवर आल्यावर --
घाटात फेकून देऊन मुळे आणि त्याचे साथीदार निघून गेले. काही वेळ घाटात पडल्यावर नितीनला शुद्ध आली. त्याने डोळे उघडून पहिले असता त्याला हा परिसर पूर्णपणे अनोळखी असल्याचे दिसले. आपण नक्की कुठे आहोत याचा त्याला काहीच अंदाज येत नव्हता. जवळ मोबाईल देखील नव्हता. कसाबसा तो घाटातून वर चालत आला आणि तेथे रस्त्याच्या कामावरील कामगारांना त्याने विचारणा केली. माळशेज घाटातील आंबे कॉर्नर असल्याची माहिती कामगारांनी त्याला दिली. तेथून एका ट्रकच्या मदतीने तो टोकावडे पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर तेथून त्याने आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि घडलेला थरार सांगितला.


0 Comments