मुलीला पळवून लपला शेतात, शेतकऱ्याने ऊसच दिला पेटवून !
वाळूज : सहा वर्षे वयाच्या मुलीचे अपहरण करून तो उसाच्या फडात लपल्याने शेतकऱ्याने थेट उसालाच आग लावली असल्याची थरारक घटना काळोख्या अंधारात घडली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथील एका उसाच्या फडात ही थरारक घटना घडली असून जिल्हाभर या घटनेची चर्चा सुरु आहे. रात्रीच्या वेळेस एका नराधमाने सहा वर्षे वयाच्या मुलीला पळवून नेले आणि मुलीसह तो ऊसाच्या फडात घुसला. अंधारी रात्र असल्याने या नराधमाला पकडणे अशक्य असल्यामुळे शेतकऱ्याने त्याला पकडण्यासाठी धाडसी युक्ती केली आणि उभा उस पेटवून दिला. उसात आगीच्या ज्वाळा उठू लागल्याने आत लपलेल्या नराधमाची कोंडी झाली आणि त्याला उसाच्या फडातून बाहेर यावेच लागले. बाहेर येताच त्याला जेरबंद करून पोलिसांच्या स्वाधीन केले गेले.
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील भराडखेडा गावाच्या विष्णू उत्तम गायकवाड या ३२ वर्षीय नराधमाने अंधाराचा फायदा उठवत उस तोडणी मजुराच्या सहा वर्षीय मुलीला पळवून उसात नेले होते. पिडीत मुलीचा पिता आपल्या सहा आणि दहा वर्षांच्या दोन मुलीना बैलगाडीत झोपवून उस तोडणी काम करीत होता. मजूर पिता ऊसाची तोडणी करीत असताना त्याला त्याच्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास आपली मुलगी कशासाठी आक्रोश करीत असेल हा प्रश्न त्याला पडला.
हातातला कोयता खाली टाकून तो मुलीना झोपवलेल्या बैलगाडीच्या दिशेने धावला. तेथे दोन मुलींच्या ऐवजी एकच मोठी मुलगी दिसली. त्याच्या काळजाचा थरकाप झाला आणि त्याने मोठ्या मुलीकडे छोट्या मुलीची चौकशी केली. एका व्यक्तीने सहा वर्षाच्या मुलीस उचलून उसात नेल्याचे मोठ्या बहिणीने पित्याला सांगितले. दरम्यान ऊस तोडणी करणारे अन्य कामगार देखील बैलगाडीजवळ जमले.
एकूण काय प्रकार घडला आहे याचा अंदाज सगळ्यांना आला आणि त्यांनी या नराधमाला शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. काळोख दाटलेला असल्याने आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. रात्रीच्या वेळेस ऊसात शोधणे देखील सोपी बाब नव्हती. अशा परिस्थितीत संबंधित शेतकरी धाडसाने पुढे आला आणि बाबासाहेब दुबिले या शेतकऱ्याने आपला एक एकर ऊस पेटवून दिला. बाबासाहेब दुबिले या शेतकऱ्याने प्रसंगाचे गांभीर्य जाणले आणि मजुराच्या मुलीसाठी आपल्या हाताने आपल्या ऊसाला आग लावली.
ऊसाला आग लागली, आगीच्या ज्वाळा उसळू लागल्यामुळे उसात लपून बसलेल्या नराधमाची प्रचंड कोंडी झाली. त्याला ऊसातून बाहेर येण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर तो ऊसाच्या फडाच्या बाहेर आला. तो बाहेर येताच सर्व कामगारांनी त्याच्या मुसक्या बांधल्या आणि सहा वर्षे वयाच्या मुलीची सहीसलामत सुटका केली. विष्णू गायकवाड या नराधमाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. सहा वर्षे वयाच्या मुलीचे अपहरण त्याने कशासाठी केले हे मात्र समजू शकले नाही. अचानक हा व्यक्ती आला कोठून आणि त्याने दोन मुलीपैकी मोठ्या मुलीला सोडून छोट्या, अवघ्या सहा वर्षे वयाच्या मुलीला का पळवले असेल असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेतच.
बैलगाडीत झोपलेल्या सहा वर्षे वयाच्या मुलीला या व्यक्तीने कशासाठी पळवले याचा पोलीस त्याचा छडा लावतीलच पण मजुराच्या मुलीसाठी शेतकऱ्याने आपल्या ऊसाला आग लावली आणि मुलीची सुटका झाली. शेतकरी बाबासाहेब दुबिले यांचे जिल्हाभर कौतुक होत असून पोलीस पुढील तपास करू लागले आहेत. कष्ट करून, कर्ज काढून ऊसाचे पिक सांभाळलेले असताना आपल्या हाताने ते पेटवून देण्याचा त्याग ऊस उत्पादकाने केला.
ऊस कारखान्याला गेल्यानंतरबिल मिळेल तेंव्हा खताची, औषधांची उधारी देण्याचे नियोजन केलेले असते. घरातील काही खर्चाचे देखील नियोजन ऊसाच्या पिकावर असते पण ऊस तोडणी मजुराच्या मुलीसाठी शेतकरी बाबासाहेब दुबिले यांनी आपल्या हाताने आपला ऊस पेटवून देवून केलेल्या त्यागाची चर्चा आणि कौतुक होणे स्वाभाविक आहे.
0 Comments