थकबाकीदारांना राहावे लागणार अंधारात ! वीज कनेक्शन तोडण्याचे महावितरणचे आदेश
सोलापूर : लॉकडाउन काळात घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याची सवलत देऊनही 52 कोटी 80 लाखांची त्यांच्याकडे थकबाकी आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी कृषीपंप वीज धोरणातून एकूण थकबाकीतील 65 टक्क्यांची सवलत देऊनही शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहेत्यामुळे आता वरिष्ठ कार्यालयाने थकबाकीदारांची यादी केली आहे. सामुहिक पध्दतीने थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडले जातील. थकबाकी भरल्याशिवाय त्यांन पुन्हा वीज जोडणी मिळणार नाही, असे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी स्पष्ट केले.
कृषीपंपाची वीज तोडल्यानंतर नाराज झालेल्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना खूश करण्यासाठी कृषीपंप धोरणातून वसूल होणारी 33 टक्के रक्कम स्थानिक पातळीवरील कामांसाठी खर्च केली जात आहे. त्यातून गावोगावी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविणे, जुन्या ट्रान्स्फॉर्मरची क्षमता वाढविणे, वीज खंडीत अथवा व्होल्टेज कमी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. तसेच शेतकऱ्यांसह कोणत्याही ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली जात आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात 759 ठिकाणी नवीन डीपी बसविले असून 402 ट्रान्स्फॉर्मरची क्षमता वाढविली जात आहे. मुख्य लाईनपासून 30 मीटर अंतरावरील जिल्ह्यातील साडेदहा हजार शेतकऱ्यांना तर 31 ते 200 मीटर अंतरापर्यंतच्या साडेबाराशे शेतकऱ्यांना नव्याने कनेक्शन दिले आहे.
आता थकबाकी वसुलीवर सर्वाधिक फोकस असून त्यातून वसूल होणाऱ्या रकमेतून सौर प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. तत्पूर्वी, घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या मालमत्तांवर बोजा चढविला जात आहे. 15 मार्चनंतर थकबाकीदारांचे सामुहिक पद्धतीने वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई हाती घेतली जाणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषीपंप धोरणानुसार अठराशे कोटी रुपये भरणे अपेक्षित असून आतापर्यंत 205 कोटींची थकबाकी जमा झाली आहे. उर्वरित थकबाकी शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी भरुन बिलाची थकबाकी शून्य करावी. त्यानंतर केवळ 30 टक्क्यांचीच माफी मिळेल आणि संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय वीज जोडणी होणार नाही, असा इशारा श्री. सांगळे यांनी दिला.
कृषीपंप, घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकीमुळे महावितरणसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे गावोगावी सौर प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील थकबाकी सवलतीच्या योजनेचा लाभ घेऊन भरावी. जेणेकरून विनाखंड त्यांना वीज मिळेल.
- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर
सोलापूर जिल्ह्याची स्थिती...
दररोज लागणारी वीज - 750 मेगावॅट
शेतीपंपाचे ग्राहक - 3,68,139
एकूण थकबाकी - 4,308 कोटी
व्यावसायिक ग्राहक - 61,305
घरगुती ग्राहक - 6,14,236
एकूण थकबाकी - 52.80 कोटी

0 Comments