बंडातात्या म्हणतात, माफी मागतो, विषय वाढवू नका !
इंदापूर : चोहोबाजूंनी रान उठल्यावर कीर्तनकार बंडातात्या कराडकर नमले असून 'माफी मागतो, आता विषय वाढवू नका' असे म्हणत त्यांनी माघार घेतली आहे.
कराडकर यांनी काल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे उद्धव ठाकरे हे बिघडले असल्याचे विधान केले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी यावेळी बोलताना 'ढवळ्या पवळ्या' ची उपमा दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले माणूस आहेत. हिंदूहृदयसम्राट असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र आहेत. दारू आणावी, मंदिरे बंद करावीत, वाऱ्या बंद काराव्यात अशा विचारांचे उद्धव ठाकरे नाहीत पण 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला' अशी अवस्था झाली आहे.
अजित पवारांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे बिघडले आहेत असे कराडकर यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनीच दारू विकण्याचा गुण लावला, त्यांनीच मंदिरे खुली करायची नाहीत असे सांगितले असल्याचेही कराडकर म्हणाले.
याच वेळी बोलताना खिल्ली उडवत त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत अत्यंत धक्कादायक विधान केले होते. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारू पीत नाही
त्याचं नाव सांगा असा सवाल पत्रकारांना त्यांनी केला आणि 'पतंगराव कदम यांच्या मुलाचे निधन कसे झाले होते ते विचारा, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे देखील दारू पिवून नाचतात अशा प्रकारचे अशोभनीय विधान कीर्तनकार असलेल्या आणि वारकरी संप्रदायाशी नाते असलेल्या कराडकर यांनी केले होते.
यावर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून त्यांनी कराडकर यांच्यावर आपला संताप व्यक्त करायला कालच सुरुवात केली आणि हे प्रकरण आता अंगलट येणार हे दिसताच बंडातात्या नरमले आणि विषय संपविण्याची भाषा करू लागले आहेत.
आपल्या वक्तव्यावरून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असे म्हणत त्यांनी या वादावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांच्या संदर्भात आपण बोललो त्यांच्याशी फोनवरून संपर्क केला आहे,
माझे वक्तव्य चुकले असेल तर माफी मागतो, आता विषय वाढवू नका' अशी नरमाईची भाषा आता कराडकर यांच्या तोंडी आली आहे. काल मात्र जोशात खिल्ली उडवीत त्यांनी महिला लोकप्रतिनिधींचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न केला होता.
वारकरी सांप्रदायातील आणि कीर्तनकार असलेल्या व्यक्तींच्या तोंडी अशी भाषा शोभत नसल्याच्या प्रतिक्रिया समाजात देखील उमटत आहेत. राजकारणात सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांची प्रतिमा अत्यंत चांगली आहे त्यामुळे कराडकर यांच्या वक्तव्याचा अनेकांना धक्का बसला आहे.
कराडकर यांच्या वक्तव्याची गंभीर दखल राज्याच्या महिला आयोगाने घेतली असून सातारा पोलिसांनी बंडातात्यावर कडक कारवाई करून ४८ तासात अहवाल सादर करण्यास महिला आयोगाने सांगितले आहे. कराडकर यांनी आपला लेखी खुलासा सात दिवसांच्या आत महिला आयोगाकडे सादर करावा असेही बजावण्यात आले आहे.
जोशात बोलली बंडातात्या आता भलतेच नरमले असल्याचे दिसत असले तरी त्यांच्या या वक्तव्यावर महिला आयोग काय भूमिका घेतेय हे येत्या काळात दिसणार आहेच. माफिनाम्यामुळे हा विषय संपतो की त्यांच्यावर कारवाई होतेय हे पाहावे लागणार आहे.
'महाराष्ट्राच्या महिला लोकप्रतिनिधी व लोकनेत्यांच्या लेकींना 'दारू पिऊन नाचतात' म्हणणारे बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग आहे.
तात्याला येरवड्यात उपचाराची गरज ! समस्त महिलांची तात्काळ माफी मागावी अन्यथा खळखट्याक अटळ आहे' अशी प्रतिक्रिया कालच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली होती तर राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेलक्या भाषेत बंडातात्यांना सुनावले आहे.
एका कीर्तनकाराच्या तोंडी अशी भाषा येणे म्हणजे तो कीर्तनकार आहे की नाही असे प्रश्नचिन्ह उभे राहते. बंडातात्या कराडकर यांची मुळे कुठे आहेत हे उभ्या महाराष्ट्राला महिती आहे. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलले. पंकजाताई असो किंवा सुप्रिया ताई असो,
एका कीर्तनकाराने महिलावरती घसरावे हे महाराष्ट्राची आणि वारकऱ्याची संस्कृती नाही. त्यामुळे ते वारकरी आहेत की नाहीत हे फार पूर्वीपासूनच तपासण्याची गरज होती. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून आपण कोण आहोत हे महाराष्ट्रासमोर सिद्ध केले आहे' अशा भाषेत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
0 Comments