मिरजेत रक्तचंदन तस्करासह अडीच कोटीचे रक्तचंदन जप्त ; खरा ‘ पुष्पा ' शोधण्याचे पोलिसांसमोर आवाहन !
आंध्रप्रदेश,कर्नाटकसह दक्षिणेतील अन्य राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेले २ कोटी ४५ लाख ८५ हजाराचे सुमारे ९८३ किलो ४०० ग्रॅम रक्तचंदन मिरज पोलिस आणि वन विभागाने पकडले आहे .
यावेळी टेम्पो चालक यासिन इनायतउल्ला खान रा . आद्दिगर कलहळ्ळी , ता . अनेकळ , जि . बंगळूरू याला ताब्यात घेण्यात आले आहे .अधिक माहिती अशी कि , कर्नाटकमधून हे औषधी लाकूड मिरज मार्गे येत असल्याची गोपनीय माहिती मिरज गांधी चौक पोलिसांना मिळाली होती . त्या अनुषंगाने रविवारी रात्री गांधी चौकीचे पोलिस कोल्हापूर रस्ता धामणी रोडवर थांबले होते.
तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार के.ए. १३-६९०० हा टेम्पो आल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून हा टेम्पो ताब्यात घेतला. घटनास्थळी वन विभागाचे पथक पाचारण करण्यात आले होते .
टेम्पोमध्ये मागील बाजूस द्राक्षबागेत वापरले जाणाऱ्या बकेटच्या मागे ३२ रक्तचंदनाचे ओंडके लपवलेले होते . आरोपीने ही रक्तचंदनाची लाकडे शाहबाज रा . बेंगलोर यांचे मालकीची असल्याचे सांगितले असून ती लाकडे कोल्हापूर येथे घेऊन जात होतो असे सांगितले आहे.
सदर प्रकरणी २ कोटी ४५ लाख ८५ हजार रूपयांचे रक्तचंदन आणि १० लाख रूपयांचा टाटा कंपनीचा ४०७ मॉडेल टेम्पो असा २ कोटी कोटी ५५ लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आला .
यामध्ये आंतरराष्ट्रीय तस्करांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या " पुष्पा " या दाक्षिणात्य चित्रपटाने धुमाकूळ घातला असून या चित्रपटात ही रक्तचंदनाची तस्करी दाखविण्यात आली आहे .
या चित्रपटात पुष्पा नामक व्यक्तीरेखा ही तस्करी करीत असल्याचे दाखवण्यात आले आहे . त्यामुळे आज सापडलेल्या या रक्तचंदनामागे खरा पुष्पा कोण आहे ? याची उकल लवकरच होईल असे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले आहे .
रक्तचंदनाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने , औषधांसाठी व इतर वस्तू बनविण्यासाठी होत असल्याने रक्तचंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे . हेच रक्तचंदन कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या सीमेलगतच मिळते त्यामुळे रक्तचंदनाची तस्करीमोठ्या प्रमाणात होत असते .
सदरची कारवाई मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक विरकर , गांधी चौकीचे सहा . पोलिस निरीक्षक रविराज फडणीस , पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे , पोउनि पाटील , पोउनि खाडे ,
सपोफौ सुभाष पाटील , उदय कुलकर्णी , सलीम शेख , पोहेकॉ सचिन कुंभार , ढेबरे , चंद्रकांत गायकवाड , झांबरे , पोना रिचर्ड स्वामी , बाळासाहेब निळे , पोना सुरज पाटील , अभिजित पाटील , पोशि अमोल आवळे , पोशि गणेश कोळेकर , पोशि प्रशांत पुजारी आदिंनी केली .

0 Comments