सांगोला नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक झाले माजी नगरसेवक...!
भावी नगरसेवकांना लागले निवडणुकांचे वेध
सांगोला : 2016 रोजी झालेल्या सांगोला नगरपालिका निवडणुकीची मुदत 30 डिसेंबर 2021 रोजी समाप्त झाल्याने सांगोला नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा तसेच सर्व 22 नगरसेवक आता माजी नगराध्यक्षा व माजी नगरसेवक बनले आहेत. सध्याच्या नगरपालिकेचा कार्यकाल पूर्ण झाल्याने आगामी निवडणुकीत नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भावी नगरसेवकांना मात्र आता निवडणुकांचे वेध लागले आहे.
कोरोनानंतर ओमिक्राॅन विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत चालल्याने तसेच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने सांगोला नगरपालिकेची निवडणूक कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही. प्रशासकीय पातळीवर मतदार याद्या तयार करणे, प्रभाग रचना करणे, तसेच वार्डनिहाय राखीव प्रवर्गातील नागरिकांना आरक्षण देणे आदी बाबी प्रलंबित आहेत. त्यामुळे नव्याने प्रभाग रचना होऊन
शहरात नगरसेवकांची संख्या वाढणार का..? ओबीसी आरक्षणाचे पुढे काय होणार..? नगरपालिकेची निवडणूक नक्की कधी होणार..? कोणत्या प्रभागात कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण राखीव राहणार..? तसेच यावेळी युत्या व आघाडी यामध्ये काही नवीन बदल होणार का..? अशा एक ना अनेक प्रश्नावर शहरातील प्रत्येक चौकात मैफिली रंगू लागल्या आहेत.
कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तीन पक्षांनी आगामी निवडणूक एकत्रित आघाडीमधून लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्ष आणि गेल्यावेळी शिवसेनेसोबत असलेला माने गट यांनीही एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. परंतु देशातील सर्वात मोठा पक्ष असे बिरूद मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीची शहराच्या राजकारणातील भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही.
नगराध्यक्षा व सभापतींच्या नावाच्या पाट्या गायब..!
नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांचा कार्यकाल 30 डिसेंबर रोजी पूर्ण झाल्याने, सांगोला नगरपालिकेच्या दालनात नगराध्यक्ष व सर्व सभापती यांच्या नावाने लावलेल्या सर्व पाट्या काढून टाकण्यात आल्या आहेत. जोपर्यंत निवडणूक होऊन नगरसेवकांतून नगराध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती निवडले जात नाहीत, तोपर्यंत या दालनांना नूतन नगराध्यक्ष व सभापतींची प्रतीक्षा कायम असेल..!
0 Comments