आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्याचे कडवे आव्हान महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसमोर असणार आहे.
सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्याचे कडवे आव्हान महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसमोर असणार आहे. स्वबळावर लढल्याचा सर्वाधिक लाभ भाजपलाच होईल, असा अंदाज व्यक्त करत आता कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरात सूर मिसळायला सुरवात केली आहे.आतापर्यंत बहुतेकवेळा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढविली आहे.
त्यांच्यातही काहीवेळा जागावाटपात वादविवाद झाले आणि त्यांनी अनेकदा स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. आता त्यांच्या जोडीला शिवसेना असल्याने आता जागावाटपाचा तिढा कसा सुटणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तरीही, महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना तिन्ही पक्षांना समान जागावाटप होईल, अशी अपेक्षा आहे.
मात्र, सध्या शिवसेना, कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे सर्वात कमी नगरसेवक महापालिकेत आहेत. आता तौफिक शेख आनंद चंदनशिवे महेश कोठे व त्यांचे समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचेच पारडे जड असणार हे निश्चित. आगामी निवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येतील, हे प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर ठरेल.
तत्पूर्वी, देगाव, जुने विडी घरकुल, शेळगी, नई जिंदगी, बाळे, जुळे सोलापूर अशा महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या पक्षाचे वर्चस्व अधिक, याचा आढावा घेतला जात आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णयही अजून झाला नसून त्यासंबंधीचा निर्णय झाल्यावर जागावाटपाचा प्रश्न सोडविणे सोयीस्कर होणार आहे.
जागावाटपात ताठर भूमिका नको
आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील. इतर पक्षातील अनेक आजी- माजी पदाधिकारी राष्ट्रवादीत आले असून आणखी काहीजण येतील. महाविकास आघाडी करण्यासाठी आमची तयारी आहे, परंतु जागावाटप करताना सर्व पक्षांनी ताठर भूमिका घेऊन जमणार नाही.
- महेश कोठे, माजी महापौर
सन्मान न मिळाल्यास स्वबळाचीही तयारी
कॉंग्रेस हा सोलापूर शहरात सर्वात मोठा पक्ष आहे. मोठा जनाधार असलेला हा पक्ष असल्याने कोणी आले काय आणि गेले काय, काहीही फरक पडणार नाही. महाविकास आघाडी करण्याची आमची तयारी आहे, परंतु वरिष्ठ स्तरावरून निर्णय होण्याची शक्यता आहे. जागा वाटपात सन्मान न मिळाल्यास आमची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे.
प्रकाश वाले शहराध्यक्ष, कॉंग्रेस
शिवसेनेची ताकद कमी होणार नाही
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेची आघाडी होणे आवश्यक आहे. तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचाही तोच विचार आहे. तरीही, महापालिका निवडणुकीत आघाडी न झाल्यास स्वतंत्र लढू. शिवसेना ही एका व्यक्तीच्या जीवावर नव्हे तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालते.
- पुरुषोत्तम बरडे जिल्हाप्रमुख, शिवसेना
0 Comments