राज्यातील दुकानांबाबत मोठा निर्णय..! ठाकरे सरकारकडून कोविड निर्बंधामध्ये पुन्हा सुधारणा..
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाला. त्यात ओमायक्राॅनचे संकट गहिरे होत असल्याने ठाकरे सरकारने 8 जानेवारी 2022 पासून राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला. या नियमावलीत सलून 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती, पण ब्यूटी पार्लर व जीम पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
ठाकरे सरकारच्या या नियमांमुळे मोठा गोंधळ झाला. त्यानंतर राज्य सरकारकडून सलूनसाठी जी नियमावली जारी केली आहे, तीच नियमावली ब्यूटी पार्लरसाठीही असल्याचा आदेश दिला. तसेच राज्यातील जीम 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यालाही परवानगी दिली. अर्थात, व्यायाम करताना मास्क असावा, तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं बंधनकारक असेल.
दुकानांबाबत मोठा निर्णय
आता राज्य सरकारने पुन्हा एकदा आपल्या निर्बंधांमध्ये बदल केला आहे. त्यानुसार राज्यातील दुकानांबाबत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडून अन्य दुकानांबाबत वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. दुकानदारांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे..
ठाकरे सरकारच्या या नव्या नियमानुसार, राज्यातील अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने आता रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार ही दुकाने रात्री 10 वाजता बंद करावी लागणार आहे, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे..
नव्या निर्बंधाची अंमलबजावणी सुरु
राज्य सरकारच्या आदेशानुसार, 8 जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून नव्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री पूर्ण संचारबंदी, तर दिवसा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी असणार आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील, तरच सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करता येईल. परराज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणं बंधनकारक केले आहे.
सलूनप्रमाणेच ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येणार आहेत. मास्कशिवाय ब्युटी पार्लरमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा आता पुढील आदेशापर्यंत घेता येणार नाहीत. ब्यूटी पार्लरमध्ये तोंडावरुन मास्क काढता येणार नाही. शिवाय ग्राहकाने, तसेच ब्युटी पार्लर चालकाने लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे.

0 Comments