पटोलेंनी अध्यक्षपद सोडण्यातील धोका ठाकरे आणि ओळखला होता ... अजितदादांनी
१० महिन्यांनतरही महाराष्ट्राच्या विधानसभेचे कामकाज अध्यक्षांविना उपाध्यक्षांच्या नेतृत्वात सुरु आहे.
काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यापुर्वी विधानसभेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यात सत्तेच्या वाटाघाटील विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आले आणि नाना पटोले बिनविरोध या पदावर विराजमान झाले. पण पुढे पक्षाच्या एक व्यक्ती एक पद या नियमानुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीसाठी नवीन खंदा शोधण्याची मोहिम सुरु झाली. काँग्रेसचा हा शोध नाना पटोले यांच्यापर्यंत येवून थांबला. त्यांनी फेब्रुवारीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देवू केला.त्यानंतर आजपर्यंत म्हणजे पुर्ण १० महिन्यांनतरही महाराष्ट्राच्या विधानसभेचे कामकाज अध्यक्षांविना उपाध्यक्षांच्या नेतृत्वात सुरु आहे. या दरम्यानच्या काळात विधानसभेची दोन अधिवेशन पार पडली.
राज्यपालांनीही दोन वेळा निवडणूक घेण्यासाठी तारिख दिली. पण राज्यपालांच्या पत्राची दखल सरकारने घेतली नाही. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे महाविकास आघाडीने घोषित केले आहे. त्यानुसार निवडणूक कार्यक्रमही घोषित केला, पण आता राज्यपालही निवडणूक घेण्याचा मूडमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. आता महाविकास आघाडीने निवडणूक घेण्याबाबत २४ तासांत तीन पत्रे पाठवूनही राज्यपाल त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
राज्यपालांचा हा मूड बदलण्याचे कारण ठरले ते म्हणजे ही निवडणूक घेण्याचा बदलेला नियम. विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाने घेण्याची यापूर्वी तरतूद होती. या गुप्त मतदानामुळे क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता असते. अशातच भाजपनेही आपला उमेदवार देण्याची घोषणा केल्याने क्रॉस व्होटिंग होवून महाविकास आघाडीची मत फुटण्याची भीती अधिक बळावली.
यावर उपाय म्हणून ही निवडणूक हात उंचावून खुल्या पद्धतीने घेण्याची तरतूद करण्यात आली. मात्र याच बदलांवर राज्यपालांनी आक्षेप घेत हा बदल घटनाबाह्य ठरवला. त्यानंतर आता हाच विषय राज्यपाल आणि सरकारमध्ये वादाचा मुद्दा बनला आहे. राज्यपालांनी नकार दिल्यानंतरही सरकार मात्र निवडणूक घेण्यावर ठाम आहे.
काँग्रेसचा गोंधळ एवढ्यावरच थांबलेला नाही. उमेदवार निवडीवरही काँग्रेसमध्ये एकमत दिसून येत नाही. १० महिने वेळ असून देखील अजूनही या पदावरील नावाबाबात पक्षात संभ्रम कायम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या निवडणुकीसाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांचे नावही चर्चेत आले. पण अद्याप पक्षााला कोणाचेही नाव अंतिम करता आलेले नाही. विशेष म्हणजे ८ दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते या निवडणुकीच्या खलबतांसाठी दिल्लीवारीवर गेले होते. पण ते मोकळ्या हातानेच माघारी परतले. दिल्लीवरुन नाव अंतिम होणार असल्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : राज्यपालांना ठाकरे सरकार थेट आव्हान देण्याच्या तयारीत
एकूणच काँग्रेसच्या या सगळ्या गोंधळामुळे सध्या महाविकास आघाडी कात्रीत सापडली आहे. एकीकडे राज्यपालांनी ही निवडणूक घटनाबाह्य सांगितली आहे, मात्र ती घेण्यावर सरकार ठाम आहे. त्यामुळे राज्यपालांनी मोठे पाऊल उचलण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. तर निवडणूक घेतली नाही तर हे अधिवेशन देखील विधानसभा अध्यक्षांविनाच पार पडणार असून निवडणूक कार्यक्रम घोषित करुनही निवडणूक न होवू शकल्याने सरकार देखील तोंडघशी पडण्याची शक्यता आहे.
हाच सगळा धोका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बरोब्बर ओळखला होता. नाना पटोलेंनी अध्यक्षपद सोडायला नको होते असे मत उद्धव ठाकरे आणि अजितदादा यांनी व्यक्त केले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही काँग्रेस आणि नाना पटोले यांच्या या निर्णयावर टीका केली होती. त्यामुळे हे सगळे असे का म्हणत होते, याचे उत्तर आता मिळाले आहे.
0 Comments