आता २१ वर्षे वयानंतरच करता येईल मुलीचे लग्न ! लवकरच होतेय कायद्यात दुरुस्ती !
मुलांप्रमाणे मुलींसाठीही लग्नाचे वय २१ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता हिंदू विवाह कायद्यात यासाठी दुरुस्ती करण्यासाठीचे विधेयक लवकरच संसदेत सादर केले जाणार आहे.
सध्या जर मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ असेल तरच त्यांना विवाहाची परवानगी आहे. यापेक्षा कमी वयात केलेले लग्न बेकायदेशीर समजले जाते. आता या कायद्यात दुरुस्ती करून मुलीचेही लग्नासाठीचे वय २१ करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
नीती आयोगाने डिसेंबर २०२० मध्ये यासाठी शिफारस केलेली होती. ही शिफारस मंजूर करून काल बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
नीती आयोगाने यासाठी नेमलेल्या कृती गटाच्या प्रमुख जया जेटलींनी याबाबत सांगितले की, हा निर्णय लोकसंख्या नियंत्रणासाठी घेण्यात आलेला नाही तर, महिला सबलीकरणासाठी घेण्यात आला आहे. विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत देशभरातील तरुण तरुणींशी साधलेल्या संवादानंतर नीती आयोगाला वरील शिफारस कृती गटाने केली होती. या संवादामध्ये मुलींसाठीही लग्नाचे वय २१ पेक्षा जास्त असावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली होती.
मुलींना यामुळे शिक्षणासाठी अधिक वेळ मिळेल, तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यास आणखी बळ मिळेल असा हेतू कायद्यामध्ये बदल करून मुलींचे लग्नाचे वय वाढविण्यामागे असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

0 Comments