महिलेच्या पायाला स्पर्श केला तरी होईल विनयभंग !
औरंगाबाद : महिलेच्या पायाला जरी स्पर्श केला तरी विनयभंगाचा गुन्हा होतोय ! होय, असा स्पर्श करणाऱ्या एका तरुणाला उच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावलीय.
महिलेचा विनयभंग अनेक प्रकाराने होऊ शकतो पण हे सर्वसामान्य माणसाला माहित नसते. विनयभंग होण्यासाठी महिलेच्या शरीराला स्पर्श व्हायलाच हवे असेही काही नसते. तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे हातवारे दुरून जरी केले अथवा काही शब्दांचे उच्चारण जरी केले तरी विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. स्पर्श केल्यावर तर नक्कीच होतो. महिलांना एक सेन्स असतो आणि त्यांना स्पर्श सहज ओळखता येतो. सहज झालेला स्पर्श आणि जाणीवपूर्वक विशिष्ठ हेतूने केलेला स्पर्श यातील फरक महिलांना सहज ओळखायला येत असतो. असाच एक प्रकार उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि महिलेच्या पायाला स्पर्श केल्यामुळे त्याची दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा कायम ठेवण्यात आली.
जालना जिल्ह्यातील परमेश्वर ढगे या तरुणाने आपल्या घराशेजारी रहात असेलेल्या एका महिलेच्या घरात रात्रीच्या वेळेस प्रवेश केला आणि तिच्या पायाला स्पर्श केला. २८ डिसेंबर २०१४ रोजी घडलेल्या या घटनेबाबत महिलेने पोलिसात धाव घेतली आणि आपला विनयभंग करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दिली.
न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली आणि न्यायालयाने या तरुणाला दोषी ठरवले. विनयभंग केल्याच्या आरोपात त्याला न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली. या शिक्षेविरुद्ध या तरुणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवली आणि दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
विनयभंग झालेल्या महिलेच्या घरी तो गुन्हा घडल्याच्या आदल्या दिवशीही आला होता आणि यावेळी महिलेचा पती घरी नसल्याची माहिती त्याला मिळाली होती. आज रात्रीही तिचा पती घरी येणार नसल्याची खात्री करून तो गेला होता आणि त्या रात्री तो महिला घरात एकटी झोपली असल्याची माहिती असताना तिच्या घरात घुसला होता.
रात्रीच्या वेळी महिला झोपली असताना तिच्या घरात घुसून तिच्या बेडवर बसून त्याने या महिलेच्या पायावरून हात फिरवला होता. या स्पर्शाने महिला जागी झाली आणि तिने आरडाओरड केली. महिलेच्या ओरडण्यामुळे तो घाबरला आणि तेथून त्याने पळ काढला. ही घटना घडल्यानंतर महिलेने आपल्या पतीस याची माहिती दिली आणि घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी महिलेने पोलिसात तक्रार केली होती.
सदर महिलेचा विनयभंग करण्याचा आपला कसलाही हेतू नव्हता असा बचाव सुनावणीवेळी या आरोपीने केला होता पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आरोपीने केलेले कृत्य हे विनयशिलतेला धक्का देणारे असून एवढ्या रात्री महिलेच्या घरी जाण्याचं काहीच कारण नव्हतं, महिलेच्या घरी जाऊन तिच्या बेडवर बसणे, तिच्या पायांना स्पर्श करणे असे कृत्य लैंगिक हेतूनेच होते असे न्यायालयाने म्हटले आहे.
शिवाय एवढ्या रात्री महिलेच्या घरी जाण्याचे कारणच काय ? असा सवाल देखील न्यायालयाने विचारला आहे. आरोपी परमेश्वर ढगे याला या प्रश्नाचे समाधानकार उत्तर देता आलेले नाही. महिलेच्या संमतीशिवाय तिच्या कोणत्याही अंगाला स्पर्श करणे हा विनयभंगच आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपीला दोषी ठरविण्यात कनिष्ठ न्यायालयाने कोणतीही चूक केलेली नाही असेही उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आपल्या न्यायदानात स्पष्ट केले आहे.
0 Comments