बेकायदेशीर दारू वाहतूक; सुमारे ४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त
सांगोला पोलीसांनी पाठलाग करून पकडले वाहन; चालक मात्र पळाला
सांगोला । बेकायदेशीर व विनापरवाना दारू आणि व्हिस्की वाहतूक करताना एक वाहन सांगोला पोलीसांनी पाठलाग करून ताब्यात घेत सुमारे ८८ हजार ८४८ रुपये किंमतीची दारू व व्हिस्कीसह ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे वाहन असा एकूण ४ लाख ३८ हजार ८४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दमदार कामगिरी केली आहे.
सदरची कारवाई दिनांक २३ रोजी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील सांगोला महाविद्यालया समोरील कडलास रोड येथे करण्यात आली आहे.याप्रकरणी पो.कॉ. रामचंद्र जाधव यांनी अज्ञात चालक व मालकाविरोधात सांगोला पोलीसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २३ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पो.कॉ. रामचंद्र जाधव व पो.ना. कोरे, पो.कॉ. शिंदे असे सांगोला पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशा प्रमाणे कडलास गावातून पेट्रोलिग करत सांगोल्याकडे येत आसताना माण नदीपुलावरील रस्तावर पोलीसांना सांगोला दिशेने एक अशोक लेलट टमटम भरधाव वेगाने जाताना दिसला .सदर टमटमचा पोलीसांना संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन सदर टमटम सांगोला महाविद्यालय, सांगोला समोरील रोडवर थांबविले असता, त्यावेळी टमटमचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला .
टमटम (एम.एच. ४५ टी . २२४७) ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये सुमारे ६१ हजार २०० रुपये किंमतीचे ऑडरिअल क्लासिक व्हीस्कीचे ३० बॉक्स आणि सुमारे २७ हजार ६४८ रुपये किंमतीचे मॅकडॉल नंबर वन कंपनीचे ९ बॉक्स आढळून आले. या कारवाईत पोलीसांनी ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या वाहनासह एकूण ४ लाख ३८ हजार ८४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

0 Comments