मंगळवेढ्यात दरोडा : चौघे ताब्यात ; साडेचार लाखाचा ऐवज पळवला दरोडेखोरांनी कापले कान ; मग शांतपणे लुटले दागिने !
मंगळवेढा शहर परिसर असलेल्या शुक्रवारच्या पहाटे तीन वाजता दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश करून गळ्याला चाकू लावून निर्दयीपणे कुटुंबातील नववधूसह सदस्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा साडेचार लाखाचा ऐवज लुटून नेला . कानातील दागिने निघत नसल्याने कात्रीने कापून नेले . जाताना घराला बाहेरून कडी लावून पोबारा केला . अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे . चौघांना ताब्यात घेतले आहे .
पोलीस सूत्रानुसार मंगळवेढा शहरालगतच्या धर्मगाव रोडवर फिर्यादी मंदाकिनी अंबादास सावंजी या त्यांच्या बंगल्यात राहतात . शुक्रवारच्या पहाटे साडेतीन वाजता अज्ञात सहा दरोडेखोरांनी कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला . फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोने , घरातील पैसे काढून द्या अन्यथा तुम्हाला खल्लास करू ,
असे म्हणत नववधूच्या अंगावरील व फिर्यादीच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले . या झटापटीत फिर्यादीच्या अंगठ्याजवळच्या बोटाला जखम झाली . चोरटे अंदाजे ३० ते ३५ वयोगटाचे असल्याचा अंदाज असून , त्यांनी अंगात जर्किन , हातात ग्लोव्हज तसेच लोखंडी सळी , हातात स्टीलचे कडे , डोक्याला रुमाल बांधलेल्या अवस्थेत होते . चोरट्यानी महिलांच्या कानातील दागिने निघत नसल्याने दरोडेखोरांनीकात्रीच्या साह्याने कट मारून काढून घेतले .
या घटनेत सोन्याचे दागिने , दोन मोबाईल व कपाटातील रोख रक्कम असा एकूण साडेचार लाखाचा ऐवज लुटून नेला . लग्नात आलेल्या साड्या व कपड़े या वस्तूही घेऊन गेले . दरोडेखोरांनी जाताना कुटुंबीयांना एकाखोलीत कोंडून बाहेरून कडी लावून गेले . त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधत सुटका करून घेतली .
या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधिकारी हिम्मतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतरघटनास्थळापासून पिकातून दामाजी कारखाना रस्त्यावरील सूत मिलपर्यंत गेले . याबाबत अज्ञात सहा चोरट्यांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे . अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे करीत आहेत .

0 Comments