दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथ.शिक्षक पतसंस्थेची यशस्वी वाटचाल -
शिक्षक सहकारी पतसंस्थांच्या उदयापूर्वी शिक्षक बांधवांना आपल्या मुला-मुलींचे उच्च शिक्षण, लग्न, घराचे बांधकाम व इतर कामांसाठी बॅंकांवर अवलंबून रहावे लागायचे. अशातच बॅंकांचे भरमसाठ व्याज, कर्जमंजूरीची किचकट प्रक्रिया, त्यामानाने मिळणारे अपुरे कर्ज व वसुलीचा धसका या सर्व गोष्टींचा शिक्षक बांधवांना होणारा नाहक त्रास कमी व्हावा अर्थातच त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर काही सहकारी शिक्षक पतसंस्था उदयास आल्या आहेत. या पतसंस्थांपैकी केवळ आणि केवळ “शिक्षक सभासद बांधवांचे हित”.. हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच यशस्वी वाटचाल करणारी एकमेव पतसंस्था म्हणून ज्या पतसंस्थेकडे पाहिले जाते ती पतसंस्था म्हणजेच दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सांगोला.
आपल्या पारदर्शी व आदर्शवत कार्यशैलीमुळे अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या या पतसंस्थेच्या वतीने आज पार पडणारा विद्यार्थी बक्षीस, आदर्श शिक्षक व उपक्रमशिल शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त या संस्थेच्या आदर्शवत अशा वाटचालीवर या लेखमालेच्या माध्यमातून टाकलेला हा प्रकाशझोत.
तालुका कार्यक्षेत्र असणाय्रा या शिक्षक पतसंस्थेची २८ जानेवारी २०१४ ची स्थापना.. संस्थेचे संस्थापक चेअरमन ग्रंथमित्र मा. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली र.नं.१९५९/२०१४. २८/०१/२०१४ या नोंदणी क्रमांकाने ही संस्था स्थापन झाली. या संस्थेची सुरवातीला असलेली १८० सभासद संख्या आज २६५ वर पोहोचली आहे. केवळ सभासदांच्या हितासाठी सुरवातीला ८.४० टक्के असणारा व्याज दर कमी करून तो ७.२०टक्के वर आणला आहे. याशिवाय १ लाख रुपयांची असणारी कर्जमर्यादा तब्बल ७ लाखांपर्यंत केली आहे. तातडीचे कर्ज, शैक्षणिक कर्ज, नफा विभागणीचे योग्य नियोजन, गंगाजळी व सभासद पाल्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी हाती घेतलेली “लक्ष्मी-नारायण शुभमंगल योजना” व १२ टक्के भरघोस असा लाभांश असे या संस्थेने महत्वपूर्ण व धाडसी निर्णय घेत राज्यातील इतर शिक्षक सहकारी पत संस्थांसमोर आगळे-वेगळे आदर्श उभे केले आहेत.
एखाद्या सभासदाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्या सभासदाच्या कुटुंबाला सावरण्यासाठी संस्थेच्या वतीने ‘गंगाजळी योजनेतून’ त्या सभासदाचे संपूर्ण कर्ज माफ केले जाते. याशिवाय त्यांच्या वारसांना ५० हजार रुपयांची तातडीची मदत देखील केली जाते. आजपर्यंत ६ मयत सभासदांचे सुमारे १३ लाख रुपयांचे कर्ज माफ करून सभासदांच्या पश्चात त्यांचे कोलमडणारे संसार संस्थेने सावरले आहेत.
तसेच सभासदाच्या एका अपत्याच्या विवाहावेळी सभासदांना आर्थिक मदत व्हावी यासाठी संस्थेने ‘लक्ष्मी नारायण शुभमंगल’ ही योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून सभासदाच्या एका अपत्याच्या विवाहाप्रसंगी ३० हजार रुपयांचा विनापरतावा धनादेश सन्मान पूर्वक प्रदान केला जातो. आजपर्यंत ३५ सभासदांना या योजनेचे धनादेश वितरित केले आहेत.
सभासद मुलांनी इयत्ता ५वी. ८वी. शिष्यवृत्ती तसेच १०वी. १२वी परीक्षेत मिळवलेल्या उज्वल यशाचे कौतुक व्हावे व भविष्यात त्यांना आणखी प्रेरणा मिळावी यासाठी प्रथम तीन विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याचा संस्थेचा स्तुत्य उपक्रम आजतागायत सुरू आहे.
विद्यार्थी प्रोत्साहन योजनेसह आपल्या पवित्र क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या क्षेत्राला यशाच्या शिखरावर पोहचवणाय्रा गुणी शिक्षक बांधवांना सन्मानित करण्याची परंपराही या संस्थेने अव्याहतपणे सुरू ठेवली आहे.
मासिक किंवा सर्वसाधारण सभांवेळी अनावश्यक खर्चाला बगल देत कोणताही भत्ता न स्वीकारणाय्रा या विद्यमान संचालक मंडळाचा कारभार अत्यंत पारदर्शी, अनेक नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी व सभासद हित हेच एकमेव ब्रीद हा ध्यास असल्याने अनेक शिक्षक बांधव या संस्थेचे सभासद होण्यासाठी इच्छुक आहेत. पूर व कोरोना सदृश्य परिस्थितीत संस्थेने मानवतेच्या दृष्टिकोनातून गरजूंना मदतीचा हातदेऊन सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे.
संस्थापक चेअरमन गुलाबराव पाटील, तानाजी खबाले, बाळासाहेब बनसोडे, मारुती काळेबाग, विश्वंभर लवटे, महादेव सुरवसे, संतोष निंबाळकर हे अभ्यासू चेअरमन या संस्थेला लाभलेले होते.
विद्यमान चेअरमन मोहन आवताडे हे सध्या या संस्थेच्या चेअरमन पदाची धुरा व्हाइस चेअरमन अंजली बिराजदार, दिलनवाज शेख माजी व्हाइस चेअरमन, भास्कर महाजन व बापूसो भंडगे हे विद्यमान संचालक मंडळ, केशवराव घोडके, सुहास कुलकर्णी, संजय काशिद पाटील, कैलास मडके, बाबासाहेब इंगोले, विलास डोंगरे ही तालुका प्राथमिक शिक्षक संघ श्रेष्ठी, सभासद बांधव व सचिव अमर कुलकर्णी यांच्याशी विचारविनिमय करून तितक्याच यशस्वीपणे सांभाळत आहेत.
सभासदांना परवडणारा व्याजदर आकारणारी, अल्पावधीतच भरघोस कर्जमर्यादा वाढवणारी, तातडीच्या व शैक्षणिक कर्जाची तत्पर सुविधा देणारी, लक्ष्मी नारायण शुभमंगल यासारखी अप्रतिम योजना कार्यान्वित करणारी ,सभासदांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जपणारी, विद्यार्थी व शिक्षक बांधवांसाठी प्रोत्साहनपर उपक्रम हाती घेणारी, पारदर्शी कारभार व विनम्र सेवा देणारी शिक्षक पतसंस्था अर्थातच दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सांगोला…म्हणजेच खडीसाखर जशी उजवीकडून, डावीकडून, वरून, खालून अर्थातच चहू बाजूंनी गोड आणि गोडच असते अगदी तशीच.
गेल्या दिड वर्षांपूर्वी माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला विद्यमान संचालक मंडळ,शिक्षक संघ श्रेष्ठी व सभासद बांधवांनी मला तज्ञ संचालक पद बहाल केले आहे. यावरूनच या संस्थेची सर्वसमावेशक कार्यप्रणाली प्रकर्षाने जाणवल्या शिवाय राहत नाही. याविषयी मला म्हणावेसे वाटते की, क्षुल्लक असणारा दोरा ज्यावेळी रंगीबेरंगी व सुगंधी फुलांच्या सानिध्यात येऊन जेव्हा आकर्षक हार बनतो तेंव्हा तोच क्षुल्लक असणारा दोरा थोडावेळ का होईना सुगंधी बनतो. अर्थातच मला या आदर्शवत संस्थेच्या कामकाजात सहभागी व्हायची गोड संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा ॠणी आहे.
आज संस्थेच्या वतीने सांगोला येथे जे गुणवत्ताधारक विद्यार्थी, आदर्श शिक्षक व उपक्रमशिल शाळा पुरस्काराने सन्मानित होत आहेत. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व या सन्मान सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या मान्यवर व सभासद बांधवांचे संस्थेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करीत आहे.
..!!!धन्यवाद!!!..
लेखक – श्री. बापूसो भंडगे.
(तज्ञ संचालक, दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथ. शिक्षक सह. पतसंस्था, सांगोला.)

0 Comments