वृद्धाचा कोयत्याने निर्घृण खून कन्नड तालुक्यातील घटना : अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल
चिंचोली लिंबाजी : तालुक्यातील लोहगावच्या वृद्ध शेतकऱ्याचा गावातून आपल्या शेतवस्तीवरील घरी अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून निर्घृण खून केला . ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेदरम्यान घडली . जगन्नाथ साळुबा मनगटे ( ६० ) असे मयत वृद्धाचे नाव आहे .
या घटनेने खळबळ उडाली असून , वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पिशोर पोलीस घटनास्थळी ठाण मांडून होते . जगन्नाथ मनगटे हे लोहगाव • बरकतपूर रस्त्याला लागून गावापासून काही अंतरावर आपल्या शेतात दोन पत्नी , दोन मुले , सुना यांच्यासह राहत होते . त्यांची तिसरी पत्नी ही माहेरी राहते .
मंगळवारी भावकीतील कारभारी मनगटे यांच्या मुलीचे गावात लग्न होते . त्यासाठी ते सहपरिवार गावात आले होते . लग्न समारंभ संपल्यानंतर जेवण करून ते मंगळवारी शेतातील घरी रात्री ८ च्या सुमारास एकटेच जात होते . गावापासून पाचशे फूट अंतरावर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयता व धारदार हत्याराने हल्ला केला . डोक्यावर , तोंडावर , कानावर पायावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले .
काही वेळानंतर घराकडे परतणाऱ्या त्यांच्या पत्नी ध्रुपदाबाईंना रस्त्यावर रक्ताने माखलेली टोपी दिसली . त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले . त्यांनी आरडाओरड केल्याने नातेवाईक धाऊन आले . योगेश संजय मनगटे , मच्छिंद्र मनगटे आदींनी त्यांना सिल्लोड येथे उपचारासाठी दाखल केले . मात्र , डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले . पोलीस पाटील भाग्यश्री शिंदे यांनी पिशोर पोलिसांना याबाबत घटनेची माहिती दिली .
सपोनि कोमल शिंदे , पोकॉ . संजय लगड , लालचंद नागलोत , निळकंठ देवरे , गजानन कहऱ्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली . प्रभारी डीवायएसपी मानकर यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात | शवविच्छेदन करून दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर लोहगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात तीन पत्नी , दोन मुले , दोन मुली सुना , नातवंडे असा परिवार आहे याप्रकरणी पिशोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
0 Comments