तीन गुंठ्यांपर्यंतचे बांधकाम करा आता विनापरवानगी !
पुणे , ता . २६ : महापालिका नगरपालिका पाठोपाठ आता ग्रामीण भागातही तीन गुंठ्यांपर्यंतच्या बांधकामांना नगर रचना विभागाची ( टाऊन प्लॅनिंग विभाग ) परवानगी घेण्याची गरज नाही . राज्य सरकारने नुकतेच मान्यता दिलेल्या युनिफाईड डीसी रूलमध्ये ही तरतूद केली आहे .
१,६०० चौरस फुटापर्यंतच्या ( १५० चौरस मीटर ) भूखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थांना मालकी हक्काची कागदपत्रे , मोजणी नकाशा , बांधकाम आराखडा हे सर्व युनिफाईड डीसी रूलमधील तरतुदीनुसार असल्याचे परवानाधारक वास्तुविशारद यांचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीस फक्त सादर करावे लागणार आहे . कायद्यानुसार विकास शुल्क भरल्यानंतर थेट बांधकाम सुरू करता येणार आहे .
त्यासाठी बांधकामास ग्रामपंचायतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही . तर १,६०० ते ३,२०० चौरस फुटापर्यंतच्या ( ३०० चौरस मीटर ) भूखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थांना बांधकामाची परवानगी मागण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानाधारक अभियंत्याद्वारे प्रमाणित आणि साक्षांकीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत संबंधित ग्रामस्थास किती विकास शुल्क भरायचे याची माहिती १० दिवसात कळवेल . ग्रामस्थाने ते शुल्क भरल्यानंतर ग्रामपंचायत १० दिवसात कोणत्याही छाननीशिवाय बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देईल . शासनाच्या नगरविकास विभागाने युनिफाईड डीसीआर जाहीर केला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे .
जिल्हा परिषदांना आदेश याबाबतचे आदेश ग्रामविकास विभागामार्फत काढण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले आहे . या निर्णयामुळे ग्रामस्थांना तळमजला अधिक दोन मजल्यापर्यंत किंवा स्टील्ट ( stilt ) अधिक ३ मजल्यापर्यंत बांधकाम करता येणार आहे . मात्र ३,२०० स्क्वेअर फुटावरील भूखंडावरील बांधकामांसाठी मात्र नगर रचना विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे .

0 Comments