दुर्दैवी घटना..... दुचाकीस्वाराच्या धडकेत साठे नगर येथील महिला ठार
सांगोला / प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावर मजुरीचे काम करणारी महिला टिपरच्या सावलीला दुपारी जेवत बसली असताना भरधाव दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार जखमी झाला .
हा अपघात सोमवारी दुपारी १ च्या सुमारास सांगोला मिरज रोडवरील कमलापूर पुलाजवळ वाहतुकीस बंद असलेल्या रस्त्यावर घडला . उजाता लखन रणदिवे ( वय ३० , रा . साठे नगर , सांगोला ) असे मृत महिलेचे नाव आहे . याबाबत पती लखन विष्णू रणदिवे यांनी दुचाकीस्वार नामदेव उर्फ बालाजी हरी शेळके ( रा . शिवणे - शेळकेवाडी ) यांचे विरुद्ध फिर्याद दिली आहे .
दरम्यान सांगोला मिरज हायवेवर अपघाताची मालिका सुरूच असून सोमवारी झालेल्या चौथ्या रस्ते अपघातात मजूर महिलेचा बळी गेला आहे . मृत उजाता लखन रणदिवे ही महिला घरातून सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास जी आर इन्फ्रा कंपनीच्या चालू असलेल्या सोलापूर सांगोला सांगली महामार्गाच्या कामावर मजुरीने गेल्या होत्या .
दुपारी एकच्या सुमारास त्या कमलापूर गावाजवळील पुलावर एम . एच . १२ / ए.यु. ३०५३ या टिपरच्या सावलीला समोर जेवत बसून इतर सहकाऱ्यांना बोलत असताना सांगोल्याकडून भरधाव येणाऱ्या एम . एच . ४५ / १७ ९९ या दुचाकीने त्यांना जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले व तो स्वतः ही टीपरवर जाऊन आदळला यामध्ये उजाता रणदिवे गंभीर जखमी झाल्याने प्रथम सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून पंढरपूरला घेऊन जाण्यास सांगितले . मात्र , वाटेतच उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला .

0 Comments