सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या भोगाव कचरा डेपो च्या परिसरात बनावट डालडा बनवणाऱ्या फॅक्टरीवर पोलिसांनी छापा टाकून फॅक्टरी सील केली. आतील परिस्थिती पाहून पोलिसांनी सुद्धा नाकाला रुमाल बांधला.
सोलापूर तुळजापूर रोड वर भोगाव हद्दीमध्ये महानगरपालिकेचा कचरा डेपो आहे, त्या कचरा डेपोच्या मागच्या बाजूला एक ट्रिपल ट्रेडिंग कंपनी नावाची फॅक्टरी आहे.त्या फॅक्टरी बाबत परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या, या फॅक्टरी मुळे अतिशय घाणेरडा वास येतो, परिसरात दुर्गंधी पसरली आहे, नागरिकांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार विशेष शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी रेड मारली.
यावेळी याठिकाणी पाहिले असता जे जनावरं कत्तलखान्यात तसेच बाहेर कापली जातात त्या जनावरांचे टाकाऊ पदार्थ याठिकाणी आणून उकळले जातात आणि इथे डालडा यासारखा पदार्थ तयार केला जातो. तो डालडा डबे भरून विक्री केली जात असल्याचं समोर आलं.
तसेच या कारखान्याला वापरली जाणारी वीज चोरून घेतली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, त्याच बरोबर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कायद्याचेही उल्लंघन झाल्याचे समोर आले. महानगरपालिकेच्या पथकानेही घेऊन या ठिकाणी पाहणी केली. पोलिसाच्या विशेष पथकाने हा कारखाना सील केला आहे याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने पत्रकारांना दिली

0 Comments