ओमीक्रॉनची लक्षणे काय आहेत ? मुंबईत ही माहिती आली समोर
मुंबईसह राज्यभरात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत. मुंबईत आतापर्यंत १४ जणांना ओमिक्रॉनचा Omicron संसर्ग झालेला आहे. सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील १३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचदरम्यान, ओमिक्रॉनची नेमकी लक्षणे काय आहेत, याची माहिती या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात ओमिक्रॉन Omicron संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रूग्णांमध्ये काही लक्षणे आढळून आली आहेत. त्यात काही प्रमाणात घशात खवखव, थकवा आणि अंगदुखी ही लक्षणे प्रामुख्याने रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. अंधेरीतील रुग्णालयात ओमिक्रॉनबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, आतापर्यंत १४ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यातील १३ रुग्णांना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
मुंबईत आढळलेल्या १४ रुग्णांपैकी आठ जणांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तर ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली, त्यात प्रामुख्याने घशात खवखव, थकवा आणि अंगदुखी ही लक्षणे दिसून आली, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. या व्यतिरिक्त त्यांच्यात कोणतेही आजार दिसून आलेले नाहीत. फुफ्फुसावर कोणताही परिणाम झालेला नव्हता, असे तपासणी अहवालात दिसून आले आहे. याचाच अर्थ साधारण ताप आणि अंगदुखीवर औषधोपचार करण्यात आले. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना मल्टिव्हिटॅमिन देण्यात आले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

0 Comments