वर्दीची शपथ घालून तरुणीवर बलात्कार ; आर्मीतील पळपुट्याचा कांड वाचून बसेल धक्का
भारतीय सैन्य दलाच्या वर्दीचा गैरवापर करून एका तरुणाने पुण्यातील तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे, 28 नोव्हेंबर: भारतीय सैन्य दलाच्या वर्दीचा गैरवापर करून एका तरुणाने पुण्यातील तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं आपण लष्करात असल्याचं सांगून पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपीनं आपला फोन बंद ठेवून पीडितेशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीनं सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रशांत भाऊराव पाटील असं अटक केलेल्या 31 वर्षीय आरोपीचं नाव असून तो बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कुंपटगिरी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याने शादी डॉट कॉम या वेबसाईटद्वारे पुण्यातील तरुणीशी संपर्क साधला होता. यानंतर त्याने पीडितेशी ओळख वाढवून तिला लग्नाचं आमिष दाखवलं. तसेच आपण सैन्य दलात नोकरीला असून सच्चा देशभक्त असल्याचं भासवलं. यानंतर आरोपीनं पीडितेला पुण्यातील दगडुशेठ मंदिरात भेटायला बोलावलं.
येथून आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू असंही आरोपीनं पीडितेला सांगितलं. यानंतर अंगावरील कपडे बदलण्याचा बाहणा करून आरोपी पीडितेला कारमधून नवले ब्रिज परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं आम्ही देशासाठी दिवसरात्र दहशतवाद्याशी लढतो, अशा भंपक गप्पा मारत पीडितेला भावनिक करुन तिच्यावर अत्याचार केला. तसेच पीडितेनं आरडाओरडा करून नये म्हणून तिला सैन्य दलाच्या वर्दीची शपथ घातली.
शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर, आरोपीनं कर्तव्यावर जाण्याचा बहाणा केला आणि पीडितेला शनिवारवाडा परिसरात सोडून देत पळ काढला आहे. यानंतर पीडितेनं आरोपीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यानं पीडितेला ब्लॉक केल्याचं लक्षात आलं. यामुळे पीडित तरुणीनं सिंहगड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास काढत आरोपीला अटक केली आहे.
पुण्यातील घटना सैन्य दलात भरती झाल्यानंतर आरोपी 2018 पासून कर्तव्यावर रुजू झाला नसल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं आहे. तसेच आरोपीनं यापूर्वी नगर, पुणे आणि लातूर परिसरात फसवणुकीचे पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.
0 Comments