google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्ह्याच्या राजकारणात स्वर्गीय भारतनानांची उणीव नेहमी भासेल : मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील

Breaking News

जिल्ह्याच्या राजकारणात स्वर्गीय भारतनानांची उणीव नेहमी भासेल : मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील

 


जिल्ह्याच्या राजकारणात स्वर्गीय भारतनानांची उणीव नेहमी भासेल : मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील 

सांगोला : तालुका प्रतिनीधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य भूमिकेसाठी स्वर्गीय भारतनाना भालके यांनी कधीच परिणामाची पर्वा न करता प्रस्थापितांशी दोन हात केले, स्वर्गीय नानांचा हा निर्भिड स्वभाव व रांगडे व्यक्तिमत्व सोलापूर जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला सदैव स्मरणात राहील. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात स्वर्गीय भारतनानांची उणीव आपणास नेहमी भासेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.


रविवार दि 28 रोजी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त सरकोली ता. पंढरपूर येथे नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नानांना आदरांजली वाहिली. यावेळी मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक अजित जगताप,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य विजय खवतोडे,भारत बेदरे, पांडुरंग चौगुले, सुनील डोके, पांडुरंग भाकरे आदी उपस्थित होते. गेली 25 वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात आपण स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या समवेत काम केले. भारतनाना भालके हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. 


मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा रथी महारथी राजकीय हस्तींचा पराभव करून त्यांनी राज्याच्या राजकारणाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. सामान्य नागरिकांच्या हिताच्या आड शासन किंवा प्रशासन येत असेल तर प्रसंगी कणखर भूमिका घेऊन नानांनी नेहमीच आक्रमक पवित्रा घेऊन लढाईची तयारी दर्शवली. अस्सल ग्रामीण परंतु करारी आणि रांगडे व्यक्तिमत्व,पैलवानी बाज असलेले वक्तृत्व व सदैव जनतेच्या गराड्यात असलेले स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांना केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्य सदैव स्मरणात ठेवेल, आणि राजकारणातील तरुण पिढी नेहमीच त्यांच्यापासून प्रेरणा घेईल. असा विश्वासही शेवटी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments