सोलापूर : महापालिकेच्या गाड्या निघणार स्क्रॅपमध्ये
सोलापूर : महापालिकेच्या विविध विभागातील ॲम्बेसिडर, फायर फायटर, डंपर, रोड रोलर, जेसीबी, ॲम्बुलन्स आदी १५ कोटी ७६ लाख किंमतच्या गाड्या 'आरटीओ'च्या मान्यतेने भंगारमध्ये काढण्यात येणार आहेत.त्याच्या निविदा प्रक्रियेला सभागृहात एकमताने मान्यता देण्यात आली. तसेच ३५ कोटींचे कर्ज काढून भूसंपादन करण्याला सभागृहाने मंजुरी दिल्याने उड्डाणपूलाचाही मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर राजेश काळे यांच्या उपस्थितीत पार पडली. सभागृहनेता म्हणून नागेश थोबडे यांनी एक दिवसासाठी सभागृहाचे कामकाज पाहिले. शहरातील पाण्याच्या विषयावरून सभागृहात गोंधळ उडाला. प्रभागात पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी शिवसेना, काँग्रेस पक्षातील सदस्यांनी केली. या मागणीने जोर धरल्याने अखेर पाण्यासंबंधीचे सर्व तातडीचे विषय दाखल करून घेण्यात आले. माध्यमिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता महापालिकेकडून देण्यात आला.
परंतु ही रक्कम शासनाकडून महापालिकेला मिळावी, असा प्रस्ताव आयुक्तांनी पाठविला. नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक चेतन नरोटे यांनी इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही यामध्ये समावेश करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत सूचविले. खंडोबा मंदिर, बिरोबा मंदिर, पार्क चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर, चार हुतात्मा चौक, प्रेरणा अस्थिविहार आदींच्या सुशोभिकरणासाठी साडेपाच कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. हिंदूस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या कंपन्यांना पेट्रोलपंप उभारणीसाठी पुणे रोड व सातरस्ता येथील महापालिकेच्या मालकी जागा देण्याचा निर्णय सभागृहात एकमताने घेण्यात आला.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणांतर्गत रस्ते, पाणी आदी कामांनाही मंजुरी देण्यात आली. नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, बाबा मिस्त्री, गुरुशांत धुत्तरगावकर, तौफिक शेख, श्रीनिवास करली आदी उपस्थित होते.
५४ मीटर रस्ता; २१ मीटरने बनणार
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सहा कमान ते मंगळवेढा रोड ते एसआरपी कॅम्पपर्यंत असा ५४ मीटर रुंदीच्या सर्व्हिस ररस्त्यासाठी ६ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, हा निधी कमी असल्याने ५४ पैकी केवळ २१ मीटर रुंदीचाच सर्व्हिस रोड करण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला.
चंदनशिवे, करली यांच्यात खडाजंगी
प्रभाग क्र. ५ मध्ये जुने प्लास्टिक पाईप बदलून डीआय पाईपलाईन टाकण्याबाबतचा ६३ लाखांचा प्रस्ताव सभापटलावर होता. या प्रभागासह इतर प्रभागातील पाईपलाईन बदलण्यात यावी, अशी मागणी भाजपसह सर्व विरोधी पक्षातील नगरसेवकांकडून करण्यात आली. त्यामुळे दुरुस्तीसह हा प्रस्ताव फेरसादर करण्याची सूचना मांडण्यात आली. नगरसेवक चंदनशिवे यांनी फेरसादरीकरणाला कडाडून विरोध करीत करली यांना चांगलेच फैलावर घेतले. या विषयावरून सभागृहात पाणीपुरवठ्या विषय चांगलाच पेटला. पक्षीय भेदभाव करू नका, शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करा. नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी पाईपलाईन घालण्यात येत आहे. वैयक्तिक प्लॉटिंगच्या ठिकाणी पाईपलाईन टाकत नसल्याचा टोमणाही करली यांचे नाव न घेता मारला. याला शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी पाठिंबा दिला.
जुन्या जलवाहिनीचे २६ कोटींचे कर्ज
आयुक्तांनी उड्डाणपूल भूसंपादनासाठी आवश्यक ३५ कोटी रुपयांकरिता कर्जाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. यावर विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी महापालिकेने यापूर्वी काढलेल्या कर्जाबाबत आयुक्तांना विचारणा केली. यावर सन १९९२ रोजी कार्यान्वीत झालेल्या सोलापूर - उजनी जलवाहिनीसाठी कर्ज घेण्यात आले होते. आजमितीला या जलवाहिनीचे २६ कोटी ८१ लाख रुपये कर्ज असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. त्याचपध्दतीने भूसंपादनासाठी कर्ज काढावे लागेल, तसा मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून कर्जासाठी मंजुरी घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
या विषयांवर झाली सर्वाधिक चर्चा
शहरातील जुने प्लॅस्टिक पाईप काढून डीआय पाईपलाईन टाकून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सदस्यांनी केली मागणी
पेट्रोल कंपनीला जागा भाडेतत्वावर देताना पेट्रोलचे वाढते दर पाहता सीएनजी पंप उभारणीसाठी महापालिकेकडून व्हावेत प्रयत्न
माध्यमिक निवृत्त शिक्षकांचा महागाई भत्ता वाढविताना प्राथमिकच्या निवृत्त शिक्षकांचाही व्हावा विचारविनिमय

0 Comments