सोलापुरातील तुरुंगाची क्षमता 141 अन् सध्या 367 कैदी ! सोलापूर शहरातील मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 141 एवढी असतानाही सध्या तुरुंगात तब्बल 367 कैदी आहेत .
सोलापूर : गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, राज्यातील बहुतेक तुरुंग कैद्यांनी हाउसफुल्ल झाल्याची स्थिती आहे.सोलापूर शहरातील मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 141 एवढी असतानाही सध्या तुरुंगात तब्बल 367 कैदी आहेत.
कोरोना काळात कैद्यांना कोरोनाची बाधा होणार नाही, याची खबरदारी घेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. सोलापूर मध्यवर्ती कारागृहातील जवळपास 70 कैदी कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आहेत. ते कैदी तुरुंगात आल्यास त्या ठिकाणी जागेची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, तुरुंगाचा विस्तार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, निधीअभावी ते काम सध्या रखडले आहे.
विस्तारानंतर तुरुंगाची क्षमता जवळपास 120 ने वाढणार आहे. घरफोडी, खून, हाणामारी, महिला अथवा तरुणीवर अत्याचार, विनयभंग, चोरी अशा विविध गुन्ह्यांतील कैदी सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तुरुंगातील काही कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. आता ते कैदी कोरोनामुक्त झाले असून सर्वजण तुरुंगात आहेत. दिवसेंदिवस तुरुंगातील कैदी वाढू लागल्याने सध्याच्या मध्यवर्ती कारागृहाचा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. त्यासाठी शासन स्तरावरून पुरेसा निधी मिळावा, अशी अपेक्षा तुरुंग प्रशासनाने व्यक्त केली आहे. सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहात सद्य:स्थितीत 367 कैदी आहेत. तुरुंगाची क्षमता 141 कैद्यांची असून त्या ठिकाणी तुरुंगाचा विस्तार केला जाणार आहे. विस्तारानंतर तुरुंगाची क्षमता 141 कैद्यांनी वाढणार आहे.
- हरिभाऊ मेंड, तुरुंग अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, सोलापूर
ठळक बाबी...
न्यायालयात सुनावणी सुरू असलेले 367 कैदी सोलापूर मध्यवर्ती कारागृहात
शिक्षा लागल्यानंतर कैद्यांची केली जाते पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी
तुरुंगाच्या विस्तारासाठी निधी नसल्याने मध्यवर्ती कारागृहात राहतात दाटीवाटीने कैदी
सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहाच्या विस्तारासाठी शासनाकडून निधीची अपेक्षा; निधीअभावी रखडले काम

0 Comments