पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव जिल्हा परिषदेत एकमताने मंजूर
सोलापूर जिल्हा परिषदेच्या जुलै महिन्यात तहकूब झालेला पंढरपूर जिल्हा व्हावा म्हणून शासनाला शिफारस करण्याचा ठराव आजच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावावर सभागृहातील एकाही सदस्याने भाष्य केले नाही, हे येथे विशेष म्हणावे लागेल. जिल्हा परिषदेची २९ जुलै रोजी ऑनलाइन सभा झाली होती. या सभेत अॅड. सचिन देशमुख यांनी पंढरपूर जिल्हा करण्याबाबत ठराव मांडला होता. वसंतनाना देशमुख यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले होते. हा ठराव मंजूर झाल्याचे देशमुख यांनी सांगताच वादळी चर्चा सुरू झाली.
त्यावर अध्यक्ष कांबळे यांनी सदस्यांचे मत विचारात घेऊन हा ठराव करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी जुलै सभेच्या इतिवृत्तात अशी नोंद केली होती. सोमवारची सभा सुरू होण्यापूर्वी मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरीचा विषय चर्चेला आला त्यावेळी देशमुख यांनी पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मंजूर करा , अशी मागणी केली. केवळ शासनाकडे जिल्हा मागणीची शिफारस तर करायची आहे. भौगोलिकदृष्ट्या आपला जिल्हा मोठा आहे. ११ तालुके आहेत. सांगोला तालुक्यातील माझे कोळा हे गाव व त्याबरोबरच पाचेगाव, किडबिसरी ही गावे शहरापासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय सोडले तर इतर सर्व कार्यालये आमच्या तालुक्याच्या ठिकाणी आहेत.
जिल्हा न्यायालय पंढरपूरला आहे. पंढरपूर ही संतांची भूमी आहे. श्री विठ्ठल मंदिरामुळे राज्यभरातील लोक येथे येत असतात. तसेच माळशिरस , करमाळा , माढा, मंगळवेढा तालुक्यांतील लोकांना हे ठिकाण जवळचे आहे.
विरोध करणारे गप्पच
ऑनलाइन सभेत पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मंजूर झाला असे म्हटल्यावर अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, आनंद तानवडे, त्रिभुवन धाईजे यांनी विरोध केला होता.
खुद्द अध्यक्ष कांबळे यांनी करमाळ्याला बारामतीला जोडायचे का, अशी प्रतिक्रिया दिली होती; पण आज सभेत ठराव मंजूर केला.
0 Comments