google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रात जाणार सोलापूरची ' स्वच्छ शाळा , सुंदर शाळा '

Breaking News

महाराष्ट्रात जाणार सोलापूरची ' स्वच्छ शाळा , सुंदर शाळा '

 महाराष्ट्रात जाणार सोलापूरची ' स्वच्छ शाळा , सुंदर शाळा '


सोलापूर : तिने अनेक अधिकारी घडविले. अधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी आणि प्रगतशिल शेतकरी, उद्योजक, व्यापारीही घडविले. हे सर्व घडत असताना तीची अवस्था मात्र दिवसेंदिवस केविलवाणीच होत होती.ही व्यथा आहे राज्यातील जवळपास सर्वच गावांमधील जिल्हा परिषद शाळांची. सोलापूर जिल्ह्यातील शाळा मात्र आता याला अपवाद ठरु लागल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुढाकार घेऊन राबविलेल्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमातून जिल्ह्यातील २ हजार ५०० शाळांचे रुपडे पालटले आहे. सीईओ स्वामी यांचा स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रम आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये जाण्याची दाट शक्‍यता आहे.


दोन दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षणच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची झुमद्वारे ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाचे सादरीकरण झाले. सोलापूर जिल्हा परिषदेने केलेल्या कामगिरीवर शिक्षणमंत्री गायकवाड आणि अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी कौतुकाची थाप मारत सोलापूर जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये लागू करण्याचे संकेत दिले आहेत.


कोरोनाला रोखण्यासाठी जवळपास दीड ते दोन वर्षे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. शाळा बंद असल्याने या शाळांची अवस्था आणखीणच वाईट झाली होती. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व त्यांच्या टिमने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी स्वच्छ शाळा, सुंदर शाळा अभियान हाती घेतले. शासनाचा एकही रुपया न घेता, लोकवर्गणीतून शाळांचे रुपडे बदलू लागले. शेजारच्या गावातील स्वच्छ आणि सुंदर शाळा पाहून गावागावांमध्ये या अभियानाची मोठी चुरस निर्माण झाली. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी काही तरी करण्याची संधी गावातील प्रत्येकाला या अभियानाने दिल्याने शाळांसाठी शिक्षकांपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांचाच मोठा हातभार लागला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. अनेक महिन्यांनी विद्यार्थी शाळेत येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नव्या रुपातील शाळा सज्ज झाल्या आहेत."प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या घराबद्दल आणि शाळेबद्दल आपुलकीची भावना असते. ज्या शाळेने आपल्याला घडविले त्या शाळेसाठी काही तरी योगदान देण्याची भावना असते. सोलापूर जिल्ह्यात राबविलेल्या या अभियानाला ग्रामस्थ आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानाला मिळालेल्या प्रचंड लोकसहभागामुळे जिल्ह्यातील शाळांचे चित्र आज बदलले आहे."


- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर

अभियानाची ठळक कामगिरी...

लोकसहभागातून स्वच्छ व सुंदर झालेल्या शाळा : २५००

लोकसहभागातून शाळांसाठी झालेला खर्च : ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक

लोकसहभागातून झालेली कामे : दुरुस्ती, रंग रंगोटी, बाग बगीचा, सीसीटीव्ही, संगणक, चित्रकलाकृती

Post a Comment

0 Comments