शेकापला सोडचिठ्ठी देत जुजारपूर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश -
सांगोला तालुका प्रतिनिधी- फियाज मुलाणी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून तालुक्यात ओळख असलेल्या कोळा जिल्हा परिषद गटात शेतकरी कामगार पक्षाला जबरदस्त धक्का देत जुजारपूर सांगोला येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा . आम दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काल मंगळवार दि 12 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला . दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय वर्तुळात शेकापला हा जबर धक्का मानला जात आहे तर जुजारपूर गावात आणि संपूर्ण कोळा गटात राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रवेशामुळे आणखी बळकटी आली आहे .गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहून ग्रामपंचायत , विविध कार्यकारी सहकारी सोसायटी , जिल्हा परिषद , पंचायत समिती , विधानसभा अशा सर्व निवडणुकांत शेकाप देईल तो उमेदवार प्रामाणिकपणे निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या समाधान शिवाजी पवार , काकासाहेब पांडुरंग हाके , वसंत गोविंद लोखंडे , सुभाष आप्पासाहेब पवार , शामराव दगडू करडे , धनाजी दत्तात्रय पवार , नवनाथ वसंत पवार आदी प्रमुख नेतेमंडळीसह गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी काल मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला . या प्रवेश कार्यक्रमात जुजारपूर गावचे मा . उपसरपंच विजय बजबळे व समाधान पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावली . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा . आम . दिपकआबा साळुंखे पाटील यांनी यावेळी शेकापमधून राष्ट्रवादीत सामील झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आपल्या पक्षात स्वागत करताना सर्वांचा यथोचित सत्कार केला . आणि यापुढील काळात कोळा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार , विस्तार , प्रचार आणि प्रसार करण्याची सूचना केली . ग्रामीण भागात सामान्य कार्यकर्त्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपण सांगोला तालुक्याचा एक सेवक या नात्याने नेहमीच कटिबद्ध राहू . जुजारपूर गावातील आपल्या पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याला साधी ठेच जरी लागली तरीही त्याच्या वेदना मला होतील . त्यामुळे पक्षात सामील झालेल्या कार्यकर्त्यांनी मी आता निश्चिंत राहावे , राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपणास सन्मानाची वागणूक मिळेलच सोबत आपल्याला गावगाड्यातील सार्वजनिक जीवनात येणाऱ्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू असा शब्द या वेळी दिपकआबांनी सर्व कार्यकर्त्यांना दिला .
0 Comments