तृतीयपंथी म्हणून तो वावरला .. अन त्याच घरात चोरी करून पोबारा केल्यानंतर समजले , तो तृतीयपंथी नसून संपूर्ण पुरूष आहे . ! तृतीयपंथी समाजाला बदनाम करून चोरी करणारा भामटा जेजुरी पोलीस ठाण्यात जेरबंद
तृतीयपंथीय आहे, म्हणून त्याला जागरण गोंधळाच्या पार्टीत सहभागी करून घेतले, कित्येक दिवस त्याच्या सहज वावराने कोणाला शंकाच आली नाही, मात्र जेव्हा त्याने त्याच घरात चोरी केली, तेव्हा तृतीयपंथीय कधीच चोरी करीत नाहीत याची पक्की खात्री असल्याने या जागरण गोंधळ पार्टीच्या प्रमुख महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली.पोलिसांनीही गांभिर्याने तपास केला आणि साताऱ्यात राहतो असे सांगणारा हा भामटा सोलापूरचा निघाला..
जेजूरी पोलिस ठाण्याच्या पोलिस सूत्रांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार तृतीयपंथीय म्हणून वावरणाऱ्या अभिषेक रावसाहेब भोरे (वय २७ वर्ष, रा. उत्कर्ष नगर, विजापूर नाका सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
त्याने फेसबुकवर तृतीयपंथीय म्हणून अकाऊंट काढलेले होते. तो जेजूरी येथील जागरण गोंधळामध्ये मुरूळी म्हणून काम करणाऱ्या एका कलाकार महिलेच्या घरी राहूनही गेला होता. त्यामुळे तो तृतीयपंथीय असल्याने कोरोनानंतर जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला परवानगी मिळाल्याने भोरे याला त्याला पार्टीत सामील करून घेतले.
काही दिवस त्याने काम केले. मात्र एके दिवशी अचानक लघुशंकेला जातो म्हणून तो बाहेर पडला. जाताना त्याने दिड तोळे सोन्याचे दागिने व सहा हजार रुपये रोख नेले. तो परत न आल्याने संबंधित महिलेने जेजूरी पोलिसांकडे फिर्याद दिली.
या व्यक्तीने अगोदर मी सातारा येथे राहणेस असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी सातारा येथे तपास केला, मात्र ही व्यक्ती सोलापूर शहरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, सहायक फौजदार चंद्रकांत झेंडे, हवालदार दशरथ बनसोडे, प्रविण शेंडे, धर्मराज खांडे यांच्या पथकाने सोलापूर येथून भोरे यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरलेले दागिने व रोख रक्कम काढून दिली. तृतीयपंथीय कधीही चोरी करीत नाहीत, याची खात्री असल्याने या चोरीवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते. त्यानुसार या भोरे यास पकडण्यापूर्वी तो तृतीयपंथीय नसल्याची खात्री झाली आणि त्याला पकडल्यानंतर ते सिध्दही झाले. थोडक्यात तृतीयपंथीयांची बदनामी करणारा भामटा पोलिसांनी जेरबंद केला..त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

0 Comments