शहरात डेंग्यू , चिकुनगुनियाचा विळखा घट्ट ; नागरिक हैराण
सांगोला ( प्रतिनिधी ) : - शहरातील बहुतांश भागात तापाने रुग्ण फणफणत आहेत . अक्षरशः डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापासून तीव अंगदुखी जाणवत आहे . अंगदुखीने रुग्ण वैतागले आहेत . अशक्तपणाने धड उभारताही येत नसल्याचे वास्तव आहे . प्रत्येकजणच रक्त तपासणी करतो असे नाही . कोरोनाच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यानंतरही ताप उतरत नसल्याने मग डेंग्यूच्या टेस्टसाठी पुन्हा खर्च करावा लागत आहे . चिकुनगुनिया सदृश तापाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत . परंतु पालिका यंत्रणेला त्याचा थांगपत्ताही लागत नाही . एकूणच पालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत आहे . शहरात कुठेही सर्वेक्षण अथवा औषध फवारणी होताना दिसत नाही . जनजागृती केली जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत . गेल्या काही दिवसांमध्ये सांगोला शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे . सांगोला शहरातील विविध भागातील घाणीचा , डासांचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे . गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सांगोला शहरात डेंग्यू , चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे . या आजारांमध्ये ताप , अतिसार , उलट्या होणे , डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसून येतात . गेल्या दोन आठवड्यांत या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आली असल्याचे चित्र दिसून येत आहे . हा आकडा पुढील काही दिवसात आणखी वाढण्याची भीती आहे . संबधित यंत्रणा सुस्त आणि डेंग्यूचे डास फास्ट अशी अवस्था बनली आहे . शहरवासीयांच्या आरोग्याशी प्रशासन खेळत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे . कोरोनापेक्षा चिंताजनक अवस्था डेंग्यू व चिकुनगुनियासदृश तापाने झाली आहे . शहरात डासांचे साम्राज्य निर्माण होत असल्याने शहराला डेंग्यूचा विळखा पडत आहे . प्रशासनाला जाग येणार का ? उसा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे .

0 Comments