सोलापूरात भाजप नगरसेवक वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर ; राजकीय घडामोडी बदलू लागल्या
सा.शब्दरेखा एक्सप्रेस न्युज. October 28, 2021
सोलापुरात आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मिलिंद नगरातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक रवि गायकवाड हे वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. यापूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांची भेट घेतली होती. रवि गायकवाड यांनी गुरुवारी आपले समर्थक पिंटू ढावरे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष एडवोकेट बडेखान अशा अनेक कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, सोलापूरचे चार हुतात्मे, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांचा ताफा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी पुण्याकडे रवाना झाला.
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी एडवोकेट प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून निवडणूक लढवत होते यावेळी संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला यामध्ये भाजपचे नगरसेवक रवी गायकवाड यांनीही आंबेडकर यांना साथ दिली मात्र त्यानंतर नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचे वंचित बहुजन आघाडी मध्ये वर्चस्व वाढल्याने अनेक नेते बहुजन आघाडीतुन वंचित झाले.
आता चंदनशिवे वंचित बहुजन आघाडी सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत त्यामुळेच रवि गायकवाड यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे ते गुरुवारी एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना भेटणार असून त्यानंतर त्यांचा निर्णय ते जाहीर करतील अशी माहिती मिळाली आहे.
0 Comments