सुमारे 1 कोटी 68 लाख रूपयाच्या पाणीपुरवठ्याच्या कामाचे आज उद्घाटन
सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला शहरासाठी नगरपरिषद अंतर्गत चिंचोली विहिर ते जलशुध्दीकरण केंद्र उध्दरण नलिका टाकणे व उपसा यंत्रे बसविणे या कामाचे उद्घाटन आज सकाळी ठिक 11 वा. आमदार अॅड. शहाजीबापू यांच्या शुभहस्ते व लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या अध्यक्षतेखाली जलशुध्दीकरण केंद्र याठिकाणी होणार आहे. सदरच्या कामाची रक्कम सुमारे 1 कोटी 68 लाख 25 हजार 761 रू. आहे.
सध्या सांगोला शहरासाठी पंढरपूर इसबावी येथून पाणीपुरवठा होत असलेल्या पुरवठा योजनेसाठी एका महिन्याचे विद्युत बिल अंदाजे 12 लाख रू. आहे. सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषदेचे विद्युत बिल सुध्दा कमी होणार असून पाणी पुरवठा सुध्दा जास्त दाबाने करता येणार असल्याची माहिती लोकनिुयक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.
यासाठी नगरपरिषदेने दि. 16 जुलै 2019 रोजी मा. सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते यासंबंधी ठराव मंजूर केला होता. यामध्ये सांगोला शहरासाठी 1984 साली कार्यान्वित करण्यात आलेल्या चिंचोली पाणीपुरवठा योजनेतील 200 मी.मी. व्यासाच्या ए.सी. उध्दरण नलिकेवर वारंवार गळती होत असल्यामुळे पाणीपुरवठा नियमित करण्यात अडचणी उद्भवत असल्यामुळे सदर योजनेतील उपलब्ध पाणी शहरास पुरवठा करणे शक्य होत नसल्याने व पावसाळ्यात सदर योजनेतून उपलब्ध होणारे पाणी शहरासाठी पुरवठा केलेस पंढरपूर भीमा नदी उद्भवातून कार्यान्वित केलेल्या सुधारित योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी येणार्या देखभाल दुरूस्ती खर्चात बचत होणार असल्याने नगरपरिषदेकडून चिंचोली पाणीपुरवठा योजनेच्या सक्षमीकरणाचा प्रस्ताव तयार करणेकामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून सदर कामाची पाणी, सर्व्हेक्षण करून आराखडे, संकल्पने व अंदाजपत्रक तयार करण्यात आली आहेत. सदर योजनेच्या अंतर्गत अस्तित्वातील चिंचोली योजनेची पाझर विहिर ते अस्तित्वातील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत 200 मी.मी व्यासाची डी.आय. के-9 उध्दरण नलिका टाकणे व पाझर विहिरीमध्ये 20 हॉर्सपॉवरचे उपसा यंत्र बसविण्याच्या एकूण रक्कम रू. 1 कोटी 68 लाख 25 हजार 761 रू. (12 टक्के जी.एस.टी सह) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास मा. अधिक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ सांगली यांचे कार्यालयाकडून दिनांक 02/03/2019 रोजीचे पत्रान्वये तांत्रिक मंजूरी मिळालेली आहे. त्यानंतर 14 वा वित्त आयोगातील कार्यात्मक अनुदानातून दि. 20/01/2021 रोजी प्रशासकीय मंजूरी मिळालेली होती. त्यानुसार सदरच्या कामाची निविदा प्रक्रिया करून ठेकेदारास कामाचा आदेश देण्यात आला आहे. सदरचे काम पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी हजर रहावे, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती सौ. शोभाकाकी घोंगडे यांनी केले आहे.
0 Comments