खरंय का ? लस न घेणाऱ्यांना रेशनचे धान्य नाही अन् एसटी प्रवासही बंद
सोलापूर: कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेतली नाहीतर एसटीतून प्रवास करण्यास बंदी आहे.रेशनचे धान्य मिळणे बंद होणार आहे, हे खरे आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, ग्रामीणमधील काहीजणांना लस टोचल्यावर काहीतरी होईल, अशी भिती आहे. त्यामुळे अनेकांनी लस टोचून घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच सुरक्षिततेसाठी तशा अफवा पसरविल्या जात असल्याचे बोलले जात आहे. लस टोचून घेणे हे ऐच्छिक आहे, परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी लस टोचून घ्यायला हवी.
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली असून ग्रामीणमध्येही दिलासादायक स्थिती आहे. अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, सांगोला व माढ्यातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे पंढरपूर व करमाळ्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याची स्थिती आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या पाचपेक्षाही कमी झाली असून त्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, शिक्षण विभागातील शिक्षकांचे मोठे योगदान राहिले आहे. तर नागरिकांनीही नियमांचे पालन केल्याने कोरोनावर नियंत्रण मिळाले आहे. ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्यांमध्ये बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. काही ठराविक गावांमध्येच रुग्ण वाढत असल्याची स्थिती आहे. तरीही, दिलासादायक बाब म्हणजे मृतांची संख्या कमी झाली आहे.
काल (शनिवारी) शहरात दोन पुरुष कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ग्रामीणमध्ये अक्कलकोट व उत्तर सोलापूर तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. बार्शीत 13, करमाळ्यात 36, माढ्यात 14, माळशिरस तालुक्यात 22, मंगळवेढ्यात 11, मोहोळ तालुक्यात सहा, पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 37, सांगोल्यात तीन तर दक्षिण सोलापूर तालुक्यात एक रुग्ण वाढला आहे. शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 24 असून ग्रामीणमधील एक हजार 389 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, लसीकरणामुळे रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. आगामी दोन-तीन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील व्यक्तींचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे.
19 लाख व्यक्तींना पहिला डोस
शहरातील तीन लाख 77 हजार 377 तर ग्रामीणमधील साडेबारा लाख व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. त्यामधील कोवॅक्सिन लस घेऊन 28 दिवस पूर्ण केलेल्या आणि कोविशिल्ड लस घेऊन 84 दिवस पूर्ण केलेल्या सव्वापाच लाख व्यक्तींनी दुसरा डोस टोचला आहे. कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण जोरात सुरु असल्याने प्रादूर्भाव कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फेब्रुवारी-मार्चपर्यंत कोरोनाची तीव्रता कमी होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
0 Comments