विद्यार्थ्यांना 3 तासांचीच शाळा ! दिवाळी सुट्टीवर प्रश्नचिन्ह
सोलापूर: विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर उपचारात्मक शिक्षणावर भर दिला जाणार आहे.या पार्श्वभूमीवर शिक्षकांची दिवाळी सुट्टी रद्द करण्याच्यादृष्टीने शासनस्तरावरून विचारविनिमय सुरु आहे. तर दुसरीकडे दिवाळीनिमित्त दोन दिवसांचीच सुट्टी देऊन इतरवेळी ऑनलाइन तास घेण्याचेही बंधन घातले जाणार आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला परंतु, तीन तासांचीच शाळा असणार आहे. त्यात इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांकडून स्वतंत्र संमतीपत्र घेण्याऐवजी मुलगा शाळेत आला, तेच संमतीपत्र गृहीत धरले जाईल, असे शालेय शिक्षण विभागातील विश्वसनीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर तिसऱ्या लाटेची शक्यता कमीच असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील पाचवीपासून पुढे तर शहरातील आठवीपासून पुढील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, परंतु शाळेची वेळ काय असावी, याबद्दल त्यात काहीच नमूद केलेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शाळांकडून वेगवेगळी वेळ सांगितली जात असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.
सोलापूर जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या एकूण दोन हजार 897 शाळा आहेत. शाळा सुरु होणार असल्याने त्या सर्व शाळांमधील सॅनिटायजिंग, स्वच्छता युध्दपातळीवर सुरु झाली आहे. दरम्यान, शाळांच्या सोयीनुसार तीन तास शाळा सुरु राहतील. त्यावेळी विज्ञान, गणित व विज्ञान विषयांवर सर्वाधिक भर द्यावा, असे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांशी चर्चा करून शाळेची वेळ निश्चित केली जाणार आहे. तर स्थानिक प्रशासनाने शाळेची वेळ निश्चित करावी, असे शालेय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दत्तात्रय जगताप म्हणाले.
आठ मुद्द्यांवर मागविला शाळांकडून अहवाल
तुमच्या भागात शाळा सुरु करण्यासारखी परिस्थिती आहे का, मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांची संमती आहे का, पालकांची बैठक घेतली का, किती पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे, शाळेची स्वच्छता केली का, सॅनिटायझर फवारणी झाली का, मुलांना बसण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था आहे का, हात स्वच्छ धुण्याची सोय आहे का, या आठ मुद्द्यांवर शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांकडून अहवाल मागितला आहे. त्यानुसार टप्याटप्याने शाळा सुरु होतील.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण
कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. परंतु, कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता धुसर समजली जात आहे. आता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी व मंगळवारी दोन दिवस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. शाळेची वेळ काही दिवसांत निश्चित केली जाईल. शाळांमध्ये मुलांना हात स्वच्छ धुण्यासाठी स्वतंत्र सोय केली जाणार असून त्यांना साबणही दिले जाईल, असेही ते म्हणाले.
0 Comments