मेलेली महिला झाली जिवंत? ; पोलिसांना ही चक्रावणारा प्रकार ; पोलिसांसमोर आव्हान
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कणबस येथील राहणारे काशिनाथ शंकर माळी याची पत्नी दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी रात्री सात वाजता कोणास काही एक न सांगता राहते घरातून निघून गेली म्हणून यांनी दिलेल्या खबरीवरून वळसंग पोलीस ठाणेस मनुष्य मिसिंग गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वळसंग पोलिसांनी त्यादरम्यान मिसिंग महिलेची शोध घेत असताना, दिनांक १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बोरामणी गावच्या शिवारातील बंदेनवाज दर्गाह लगतच्या वनविभागाचे गट नंबर ७६९ च्या पूर्व बाजूस असलेल्या विमानतळ व वन विभागाच्या बांधालगत चारीमध्ये एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे मयत कुजलेल्या अवस्थेत मिळून आले. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते , अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना जिल्हयातील मिसिंग संदर्भातील माहिती घेवून कार्यवाही करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्जेराव पाटील यांनी सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथकास जिल्हयातील व लगतच्या जिल्हयातील मिसिंग संदर्भात माहिती घेवून गुन्हयाची उकल करण्याबाबत सूचना दिल्या.
दम्यान वळसंग पोलीस ठाणेकडील मिसिंग मधील खबर देणा-या व्यक्तीस व त्याचे नातेवाईकांस बोलावून घेवून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे असलेल्या सदर अनोळखी स्त्रीचे प्रेत दाखविले असता, खबर देणा-या व्यक्तीने व त्याच्या भावाने व त्यांच्या नातेवाईकांनी प्रेत हे खबर देणा-या व्यक्तीच्या पत्नीचेच असल्याचे ओळखून सांगून मिसिंग महिलेच्या भावाने माझीच बहिण असल्याचे सांगून प्रतिज्ञापत्र दिले आणि प्रेत ताब्यात घेवून त्याचे अंतविधी सुद्धा केला आहे.
मात्र अचानक गुन्हे शाखेच्या पथकास तांत्रिक विश्लेषणावरून माहिती मिळाली की, वळसंग पोलीस ठाणेकडील मिसिंग गुन्ह्यातील महिला ही जिवंत असून ती मौजे भंडारकवठे ता. दक्षिण सोलापूर येथील पत्राशेडमध्ये मागील काही दिवसापासून भाडयाने राहवयास असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. त्यावरून भंडारकवठे येथे जावून पत्राशेडमध्ये शोध घेतले असता मिसिंग मधील महिला मिळून आली. तिला वळसंग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
खून करून बोरामणी भागात टाकून दिलेली महिला कोण होती? असा प्रश्न उपस्थित होत असून तिची ओळख पटवून तिचा मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला, या सर्व बाबी चक्रावून सोडणाऱ्या आहेत. त्या महिलेची ओळख कशी पटली? त्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत, त्यामुळे मेलेली महिला जिवंत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता बोरामणी भागातील वनात खून करून टाकलेली महिला कोण होती, तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
0 Comments