वन राज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच दोन हरणांची शिकार
इंदापूर: छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडून चिंकारा हरणाला जागीच जायबंदी करून दोन चिंकारा हरणांची शिकार करत त्या हरणांना गाडीत घालून पसार झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या ठिकाणी घडली आहे. वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मतदारसंघातच शिकारीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याने सांगितले की, शेतातून येत असताना मोठा आवाज झाल्याने मी वनीकरणातील चार चाकी वाहनाकडे पाहिले असता त्यातून बंदुकीतून हरणाला गोळी झाडल्याचे दिसले व त्यातील तिघा जणांनी गाडीतून उतरून हरणास गाडीत घातले तर तिथेच दुसऱ्या 100 फुटाच्या आतच असलेल्या दुसऱ्या एका शेतातील कामगाराने ही दुसऱ्या चिंकाराची शिकार करताना पाहिले.
या परिसरात मोठ्या प्रमाणात चिंकारा हरणांची संख्या असून हे वैभव वाचवण्यासाठी मागील वीस वर्षापासून आम्ही काम करत असून या शिकाऱ्यांचा छडा लावून त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी इंदापूर तालुका चिंकारा बचाव अभियानाचे प्रमुख भजनदास पवार यांनी केली आहे. शिकार झाली या ठिकाणच्या परिसराचा पंचनामा केला असून येथीलच एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात देखील हे वाहन दिसले असून तीन अज्ञात इसमानंवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास तातडीने लावू असे इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. चिंकारा हरणांची शिकार होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे या बंदूकधारी शिकार्यामुळे परिसरातील शेतकरी ,कामगार ,नागरिक देखील भयभीत झाले आहेत.
0 Comments