महाराष्ट्रासह बारा राज्यांच्या सीमेवरील तपासणी नाके हटविण्याचे आदेश केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून राज्यांना पत्र
पुणे : महाराष्ट्रासह देशभरातील एकूण १२ राज्यांच्या सीमांवर असलेले प्रादेशिक परिवहन विभागाचे तपासणी नाके हटविण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत . याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून राज्यांच्या वाहतूक विभागाच्या सचिवांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे . देशात जुलै २०१७ मध्ये वस्तू आणि सेवा कराची ( जीएसटी ) अंमलबजावणी सुरू झाली असल्याने या तपासणी नाक्यांची आवश्यकता नसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे . देशभरातील राज्यांच्या सीमांवर असलेले तपासणी नाके तातडीने बंद करण्याबाबची मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती . याबाबत आंदोलनही करण्यात आले होते . संबंधित तपासणी नाक्यांवर वाहतूकदारांचा मोठा वेळ वाया जाण्याबरोबरच आर्थिक त्रासही होत असल्याच्या तक्रारीही वेळोवेळी करण्यात येत होत्या .
महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांतील तपासणी नाके हटविण्याबाबत केंद्र शासनाकडून राज्यांना आदेश देण्यात आल्यानंतर याबाबत वाहतूकदारांनी समाधान व्यक्त केले असून , निर्णयाचे स्वागत केले आहे . देशात वस्तू आणि सेवा कराची आकारणी होत आहे . त्यामुळे राज्यांच्या तपासणी नाक्यांची. आवश्यकता नाही . वाहन आणि चालकांबाबतची सर्व माहिती वाहन आणि सारथी या संगणक प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने सध्या उपलब्ध आहे . त्यामुळे राज्यांच्या सीमांवर असलेले तपासणी नाके काढून टाकण्यात यावेत . कार्यवाहीबाबत केंद्राला तातडीने माहिती द्यावी , असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने राज्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रातून देण्यात आले आहेत . महाराष्ट्रासह मध्य प्रदेश , पश्चिम बंगाल , बिहार , केरळ , तेलंगणा , आंध्र प्रदेश , गेवा , उत्तराखंड , छत्तीसगड , पुड्डचेरी , राजस्थान आदी राज्यांच्या त्यात समावेश आहे .
0 Comments