बदल्यांच्या गोंधळात कामांना लागला ब्रेक - सांगोला पंचायत समितीमधील प्रकार ; घरकुल लाभार्थ्यांचे कार्यालयाकडे हेलपाटे
सांगोला / प्रतिनिधी घरकुल बांधकामांचा धनादेश तसेच बांधकाम मजुरांचे मस्टर गटविकास अधिकारी यांच्या डिजीटल सही अभावी मागील २० दिवसापासून कार्यालयात पडून आहेत . परिणामी घरकुल लाभार्थ्यांची बांधकामे थांबली आहेत . यामुळे शासनाच्या घरकुल योजनेला ब्रेक लागला आहे . यावर पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने यासंदर्भात लक्ष घालून घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा , अशी मागणी आता घरकुल लाभार्थ्यांमधून होत आहे . सांगोला पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची प्रशासकीय नियमानुसार सांगली जिल्ह्यातील शिराळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी बदली झाली आहे . त्यानंतर रिक्त झालेल्या सांगोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सध्या मंगळवेढा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे .
त्यांनी गटविकास अधिकारी पदभार स्वीकारला असला तरी नव्याने सांगोला पंचायत समिती साठी लोकरे यांची गट विकास अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे . परंतु लोकरे यांनी अद्यापी सांगोला पंचायत समितीचा पदभार स्वीकारला नसल्याने सदरचा अतिरिक्त पदभार हा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्याकडेच आहे मागील वीस दिवसापासून गट विकास अधिकारी यांची डिजिटल सही तयार करण्यात आली नसल्यामुळे , पंचायत समितीची अनेक कामे खोळंबली आहेत . यामध्ये प्राधान्याने घरकुल विभागातील नागरिकांची घरकुल बांधकामांचा धनादेश तसेच बांधकाम मजुरांचे मस्टर जाग्यावरच सही अभावी पडून आहेत . परिणामी तालुक्यातील अनेक घरकुलांची कामे रखडली आहेत . अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांचे हेलपाटे दररोज सुरू असली तरी कार्यालयीन कर्मचारी यांच्याकडून अद्याप सही झाली नाही . गटविकास अधिकारी नव्याने रुजू झालेले नाहीत , असे सांगितले जात असल्याने लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .


0 Comments