google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शाळांची वेळ ठरली ! 4 ऑक्टोबरपासून भरणार 11 ते 5 शाळा

Breaking News

शाळांची वेळ ठरली ! 4 ऑक्टोबरपासून भरणार 11 ते 5 शाळा

शाळांची वेळ ठरली ! 4 ऑक्टोबरपासून भरणार 11 ते 5 शाळा 


शाळेची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी पाचपर्यंत असेल , अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी दिली .

 सोलापूर: शहरातील आठवी ते बारावी तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा 4 ऑक्‍टोबरपासून ऑफलाइन भरणार आहेत.शाळेची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी पाचपर्यंत असेल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी दिली. शाळा सुरु करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठविला आहे, असेही ते म्हणाले.


सोलापूर जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या दोन हजार 897 शाळा आहेत. त्या शाळांमध्ये जवळपास अडीच लाख विद्यार्थी आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता कमी झाल्यानंतर शाळा ऑफलाइन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, धोका अजूनही टळला नसल्याने सर्व शाळांना कोरोनासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करावेच लागणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन तंतोतंत करावे लागणार आहे. विद्यार्थी एकत्रित येतील, अशा मैदानी खेळांवरही निर्बंध राहतील, असेही शिक्षणाधिकारी बाबर म्हणाले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनीही सुरक्षिततेसाठी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थी घोळका करून बसणार नाहीत, याकडेही मुख्याध्यापक व शिक्षकांनी लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. ऑफलाइन शाळा सुरु होणे खूप गरजेचे असल्याने राज्य सरकारने ग्रामीणमधील पाचवी ते बारावी तर शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली. आता कोरोना नियमांचे पालन व मुलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी, याचे पत्र सर्व शाळांना (मुख्याध्यापक) यांना पाठविले जाणार आहे.

- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

मुलांची उपस्थितीत हीच पालकांची संमती

ऑफलाइन शाळा सुरु झाल्यानंतर मुलांची उपस्थिती ऐच्छिक असणार आहे. शिक्षकांनी कोणत्याही विद्यार्थ्यास शाळेत येण्याची जबरदस्ती करू नये. दरम्यान, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती हीच पालकांची संमती समजून त्या विद्यार्थ्याला वर्गात बसवावे, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

ठळक बाबी...

- राज्यातील जवळपास सव्वालाख शाळा (पाचवी ते बारावी) 4 ऑक्‍टोबरपासून उघडणार

- पाचवी ते बारावीच्या वर्गात अंदाजित सव्वाकोटी विद्यार्थी; सोशल डिस्टन्सिंग ठेवून शाळा भरणार

- नियमित वेळेत भरतील शाळा; सकाळी 11 ते सायंकाळी पाचपर्यंत सुरु राहणार वर्ग

- जेवणाच्या सुट्टीत गर्दी होणार नाही, याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर

- वर्गात दोन मुलांमध्ये किमान पाच फुटांचे अंतर ठेवावे; शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुख्याध्यापकांना सूचना

Post a Comment

0 Comments