सांगोल्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढती संख्या मास्क लावून फिरणाऱ्या माकडाच्या व्हिडीओ क्लिपची सांगोल्यात चर्चा
सांगोला । प्रतिनिधी सांगोला शहर व ग्रामीण भागात नागरिकांना कोरोना गेल्याचा भास होऊ लागल्याने विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे . प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईपुरतीच नागरिकांना कोरोनाची भीती वाटते का , असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . तर माकडाच्या मास्क घालून इलेक्ट्रॉनिक मीडियावर फिरणाऱ्या क्लिपमुळे आतातरी नागरिकांनी शहाणे व्हावे , असा मेसेज सध्या सांगोला शहरात चांगलाच फिरताना दिसत आहे . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये १० दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले होते . त्यामध्ये सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या घेण्यात आली होती . सोमवार , दि . २३ पासून जिल्हाधिकारी यांनी घातलेले निर्बंध उठवत अटी व शर्तीच्या सूचना देत सर्व व्यवसाय सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्यात .आली .
परंतु सांगोला शहरासह ग्रामीण भागातील नागरिक कोरोना संसर्ग नसल्यासारखे वागताना दिसत आहेत . सॅनिटायझर , मास्क व सामाजिक अंतर याचे कोणाकडूनही पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे . परिणामी तालुक्यातील आजपर्यंत १५२ नागरिकांचे कोरोना संसर्गाने बळी गेले आहेत . तर तालुक्यात दररोज ३० ते ५० च्या दरम्यान नव्या रुग्णांची भर पडत आहे . वेळेचे बंधन अनेक व्यापाऱ्यांनी पाळणे सोडून दिल्याने नगरपरिषदेच्या वतीने दररोज दुपारी ४ च्या पुढे १ तासभर दुकाने बंद करा , असे आवाहन करीत फिरावे लागते आहे . दिवसभरात कामानिमित्त बाहेर पडलेल्या अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो . अशातच सध्या शहरात माकडाला देखील कोरोनाचे भीती असून ते सुद्धा मास्क घालत आहे , तर नागरिकांना का हे कळत नाही , असा मेसेज फिरत असल्याने नागरिकांना फक्त दंडात्मक कारवाईचीच भाषा समजते का , असा प्रश्न निर्माण झाला आहे .
0 Comments