पंढरपूर, माळशिरस, सांगोल्यात "या' कारणामुळे रुग्णवाढ मोठी!
ग्रामीणमधील जवळपास साडेसातशे गावे कोरोनामुक्त झाली असून, काही गावे कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत.सोलापूर : ग्रामीणमधील जवळपास साडेसातशे गावे कोरोनामुक्त (Covid-19) झाली असून, काही गावे कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तरीही माळशिरस (Malshiras), सांगोला (Sangola), पंढरपूर (Pandharpur) या तालुक्यांमध्ये रुग्ण वाढत आहेत. त्याचे कारण म्हणजे माळशिरसशेजारी सातारा (Satara) तर सांगोल्याशेजारी सांगली (Sangli) हा जिल्हा येतो. त्या जिल्ह्यांमध्ये सध्या रुग्ण वाढत असून अनेकांची ये-जा त्या ठिकाणी आहे. तर पंढरपुरात विविध ठिकाणांहून लोक येतात. त्यामुळे त्या तालुक्यात तथा तालुक्यातील ठराविक गावांमध्ये रुग्ण वाढत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी दिली. त्या ठिकाणचे होम आयसोलेशन बंद केले असून ठोस उपाययोजनांच्या माध्यमातून प्रादुर्भाव कमी करण्याचे नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.माळशिरस तालुक्यात बुधवारी (ता. 21) 105 तर पंढरपूर तालुक्यात 158 रुग्ण आढळले आहेत. शहरात नऊ रुग्णांची भर पडली असून ग्रामीणमध्ये 456 रुग्ण आढळले आहेत. ग्रामीणमध्ये पाच तर शहरातील एका रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोनाचा जोर अपेक्षेप्रमाणे कमी झालेला नाही. ठराविक गावांमध्येच रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी ग्रामीणमध्ये बार्शीत 18, मोहोळ तालुक्यात 36, करमाळ्यात 27, माढ्यात 49, सांगोल्यात 57, उत्तर सोलापूर तालुक्यात पाच, दक्षिण सोलापूर तालुक्यात एक रुग्ण आढळला आहे. ग्रामीणमधील रुग्णसंख्या एक लाख 43 हजार 137 झाली असून त्यापैकी एक लाख 36 हजार 867 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चिंतेची बाब म्हणजे तीन हजार 75 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजार 195 झाली आहे. तर शहरात आतापर्यंत 28 हजार 805 रुग्ण आढळले असून त्यातील 27 हजार 287 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 95 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एक हजार 423 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे तंतोतंत पालन करायला सुरवात केल्याने शहरातील संसर्ग कमी झाला आहे. ग्रामीणमधील नागरिकांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.तीन तालुक्यांना दिलासा ग्रामीणमधील माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात रुग्ण वाढत असतानाच अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी अक्कलकोट व मंगळवेढा तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे, दक्षिण सोलापुरात अवघा एक तर उत्तर सोलापूर तालुक्यात पाच रुग्ण आढळले आहेत. तर म्युकरमायकोसिसचा बुधवारी एकही रुग्ण आढळला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
0 Comments