मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज आमदार समाधान आवताडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली.
पंढरपूर (सोलापूर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज आमदार समाधान आवताडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली. या वेळी "समाधान, तू नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस. मलाही समाधान आहे', असे म्हणत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आमदार श्री. आवताडे यांना चांगले काम करा, असे सांगून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करून विजय मिळवला होता. मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल - रुक्मिणीचे पूजन झाले. तेव्हा शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व समाधान आवताडे यांची भेट झाली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आवताडेंना शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या भेटीविषयी आमदार श्री. आवताडे यांना विचारले असता, "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, विधानसभेची पोटनिवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे प्रथमच पंढरपुरात आले होते. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह आपण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या स्वागताला सोमवारी रात्री जाणार होतो. तथापि, मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे नियोजित वेळेपेक्षा आधी आल्यामुळे सोमवारी रात्री त्यांचे स्वागत करता आले नाही मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा ते मुंबईकडे निघालेले असताना निरोप आला. त्यामुळे आपण तातडीने विश्रामगृहात पोचलो. शासकीय विश्रामगृहाच्या आवारात श्री. ठाकरे यांना श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्ती भेट देऊन आपण त्यांचे स्वागत केले. त्यांची काही मिनिटे उभ्या उभ्याच भेट झाली. आपल्याकडे पाहून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी, समाधान, तू नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस, मलाही समाधान आहे, असे म्हणत पाठीवर थाप टाकून चांगले काम करण्याविषयी आपल्याला शुभेच्छा दिल्या, असे आमदार श्री. आवताडे यांनी सांगितले.
0 Comments