सांगोला : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन व संचारबंदी असूनही सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कोरोनाविषयक नियमांचे पालन करून एप्रिल महिन्यातील केवळ १८ दिवसांत तब्बल ५२६ दस्त खरेदी - विक्रीच्या नोंदणीतून शासनाला तब्बल १ कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे .
शहरासह १०३ गावे असलेल्या सांगोल्यात दररोज घर जागा ( प्लॉट ) , शेतजमिनीच्या खरेदी - विक्रीचे १२ ते १५ तर कधी २० पर्यंत दस्त नोंदणीचे व्यवहार होतात . त्यामुळे सांगोल्यात दुय्यम निबंधक कार्यालय नेहमीच दस्त लेखनिक , पक्षकार , एजंटांमुळे गजबजलेले असते.या कार्यालयांतर्गत मुद्रांक विक्रेते , दस्त लेखनिक , जमीन ,घर जागा , प्लॉट , बंगले आदी खरेदी विक्रीच्या व्यवहारातील एजंट अशा अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे . सध्या कोरोना महामारीमुळे अत्यावश्यक सेवेतील आस्थापने वगळता सर्व व्यवसाय , उद्योगधंदे बंद आहेत . तर शासकीय कार्यालयात अधिकारी , कर्मचारी ५० टक्के उपस्थिती दर्शवून कार्यालयीन कामकाज पाहतात . अशा संकटसमयी सांगोल्यातील दुय्यम निबंधक कार्यालयावर कोरोना महामारीचा फारसा फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे . कोरोनाविषयक नियमांचे पालन करून एप्रिल महिन्यात या कार्यालयातून सुट्टीचे दिवस वगळून १८ दिवसांत पक्षकारांकडून खरेदी खत , बक्षीसपत्र , गहाणखत , वाटणीपत्र , अदलाबदल , हक्क सोडपत्र , पीक कर्ज अशा ५२६ नोंदणींतून शासनाला तब्बल १ कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे . पक्षकारांनी एप्रिल महिन्यापूर्वीच खरेदी - विक्रीचे चलन काढून ठेवले होते . त्यामुळे दस्त नोंदणीचे व्यवहार विनाविलंब पार पडल्याचे दुय्यम निबंधक प्रमोद कोकाटे यांनी सांगितले .
0 Comments