सोलापूरच्या पालकमंत्र्यांविरोधात दोन खासदार, आठ आमदारांचे आज उपोषण रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि कोविड लसीचा पुरवठा करताना सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे. याविरुद्ध भाजपचे दोन खासदार, आठ आमदार आज गुरुवारी जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.देशमुख म्हणाले, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पालक म्हणून निष्क्रिय ठरले आहेत. रुग्णांच्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्याला पुरेशी रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जात नाही.ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत होत नाही. कोरोनाची लसही लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही. जिल्ह्याला अँटिजन टेस्ट किटचा अपुरा पुरवठा केला जातो. उलट ज्या जिल्ह्याचे मंत्री आहेत, त्या जिल्ह्यास झुकते माप देऊन सोलापूरचा कोटा त्या जिल्ह्यात वळविला जात आहे. त्यामुळेच सोलापूरचा मृत्युदर वाढला आहे.या संदर्भात आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही पूर्तता केली जात नाही , म्हणून आम्ही उपोषण करीत आहोत.या उपोषणात खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य , खासदार रणजीतसिंह निंबाळकर , आमदार सुभाष देशमुख , आमदार विजयकुमार देशमुख , आमदाररणजीतसिंह मोहिते पाटील , आमदार प्रशांत परिचारक , आमदार राजेंद्र राऊत , आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार राम सातपुते , आमदार समाधान आवताडे , भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.उजनीसाठी पक्षविरहित लढा उभारणार देशमुख म्हणाले, उजनीचे पाणी इंदापूरला वळविण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात आहे. काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते अंग राखून प्रतिक्रिया देत आहेत, परंतु त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही उजनीच्या पाण्यासाठी पक्षविरहित लढा उभारणार आहोत.
0 Comments