राज्यात 7 मे पर्यंत मेघगर्जनेसह गारपीटीची शक्यता तर पुण्यात आठवडाभर ढगाळ वातावरण
पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातही पूर्व मोसमी पावसाची स्थिती कायम आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात विविध ठिकाणी गारपीटीसह जोरदार पाऊस झाला आहे. त्यानंतर आता पुण्यात आठवडाभर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात मेघगर्जनेसह गारपीटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत पाऊस झाला. तर विदर्भासह गोवा, कोकण या ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. आता पुढील आठवडाभर पुण्यात अवकाळी पावसाचे ढग असणार आहे. पण 7 मे पर्यंत राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोमवारी तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा घसरला असून, राज्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटक राज्यात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय राज्यात शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


0 Comments