सांगोला ( सोलापूर ) : व्यापाऱ्यांवर लादलेले निबंध हे चुकीचे असून , सरकारने पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कोरोना बाबतीत घालून दिलेले नियम व अटींचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी ; अन्यथा 48 तासांत दुकान उघडण्याची परवानगी नाही दिल्यास सर्व व्यापारी दुकाने उघडणार असून , तीव्र आंदोलन करणार आहेत ,
असे निवेदन सांगोला शहर व तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने तहसीलदार यांना आज ( बुधवारी ) देण्यात आले . व्यापारावरील निबंधामुळे सांगोल्यातील व्यापारी याविरोधात आक्रमक झाले आहेत . सांगोला शहरात स्टेशनरी , हार्डवेअर , हॉटेल , इलेक्ट्रिक , कापड दुकाने , सोने - चांदी , सलून व इतर सर्व व्यापारी असे एकूण चार हजार व्यावसायिक आहेत . प्रत्येक दुकानामध्ये दोन कामगार याप्रमाणे 12 हजार लोकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो . सध्या या सर्व व्यापारी , कामगारांची कोरोना चाचणी झालेली असून सध्याच्या व्यापाऱ्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे . तसेच 13 एप्रिल रोजी पाडवा व 14 एप्रिलपासून रमजान सणाचे उपवास सुरू होत आहेत . या सणांचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचे ठरवून दिलेले नियम व अटींचे पालन करून सर्व व्यापाऱ्यांना सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी . तसेच 48 तासांत दुकाने उघडण्याची परवानगी नाही दिल्यास शहरातील सर्व दुकाने उघडणार असून , याविरोधात तालुक्यातील व्यापारी महासंघ तीव्र आंदोलनही करणार असल्याचे या निवेदनात दिले आहे .व्यापाऱ्यांचे हे निवेदन नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी स्वीकारले . या वेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश वाघ , चंदन होनराव , बाळासाहेब मस्के , आनंद घोंगडे , संतोष चोथे , अजय भोसले , प्रभाकर घोंगडे , संतोष लाटणे , योगेश ज्ञानमोटे , बाबूराव खंदारे , अस्मिर तांबोळी व इतर व्यापारी उपस्थित होते . कोरोनाच्या महामारीमुळे अगोदरच व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे . सध्या व्यापाऱ्यांवर निबंध लादल्याने व्यापारी व कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे . 48 तासांत दुकाने उघडण्याची परवानगी नाही दिल्यास सर्व दुकाने आम्ही उघडणार आहोत सतीश वाघ , अध्यक्ष , व्यापारी महासंघ , सांगोला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी शहरातील सर्वच व्यापारी व कामगारांची कोरोना चाचणी झाली आहे . कोरोनाच्या नियम व अटींचे पालन करीत सर्वच व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे . - संतोष चोथे , फर्निचर व्यावसायिक , सांगोला
0 Comments