सांगोला : आईसोबत धुणे धुवायला गेलेला दिव्यांग तरुण वाढेगाव ( ता . सांगोला ) येथील बंधाऱ्यात बुडाला आहे . विनायक ऊर्फ समाधान विठ्ठल मोरे ( वय ३० , रा . वाढेगाव , ता . सांगोला ) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे .
ग्रामस्थांनी प्रयत्न करूनही सायंकाळी ६ पर्यंत त्याचा मृतदेह मिळाला नाही . ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे . याबाबत माहिती अशी , समाधान मोरे हा युवक आपल्या आईसोबत वाढेगाव येथील नदीवर असणाऱ्या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस धुणे धुण्यासाठी गेला होता . आई कपडे धूत असतानाच समाधान बंधाऱ्यातील पाण्यामध्ये उतरला . पहिल्या वेळी पोहून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये गेला असता तो वर आलाच नाही . यानंतर स्थानिक लोकांनी पाण्यामध्ये शोध घेतला . मात्र , समाधान आढळून आला नाही . त्यानंतर सांगोला प्रशासनाकडूनही साध्या होडीद्वारे समाधानचा शोध घेण्यात आला . परंतु , प्रशासनालाही समाधानाला शोधून काढण्यात यश आले नाही . त्यानंतर सायंकाळच्या सुमारास सोलापूर येथील शोध पथकास बोलविण्यात आले . रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते .
0 Comments