घेरडी येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या.....माहेरहून मोटार सायकल व सोने घेण्यासाठी पैसे आण म्हणून विवाहितेचा केला जात होता जाच.....
लग्नात मानपान केला नाही, सोने दिले नाही, मोटारसायकल घेऊन दिली नाही असे टोमणे मारून माहेरहून मोटार सायकल, सोने घेण्यासाठी पैसे आण म्हणून सतत शिवीगाळ मारहाण करून विवाहिता गरोदर असताना देखील तिला उपाशी ठेवून, शिळे अन्न खाण्यास देऊन तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळूनच विवाहितेने स्वतःच्या घरातील रॉकेल हाताने अंगावर टाकून घेऊन पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घेरडी (ता. सांगोला) येथे दिनांक २४ मार्च रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या आत्महत्येस तिचा नवरा आणि सासू हे दोघे कारणीभूत आहेत अशी तक्रार विवाहितेचे वडील शंकर भिवा आलदर (रा. घेरडी, ता. सांगोला) यांनी सांगोला पोलिसात दाखल केली आहे .याबाबत सविस्तर हकीकत अशी की, घेरडी (ता. सांगोला) येथील फिर्यादी शंकर भिवा आलदर यांनी त्यांची मुलगी अनिता हिचा विवाह गावातीलच हरिबा शिवाजी माने यांच्याबरोबर सन २०१८ मध्ये लावून दिला. विवाहानंतर हरिबा माने यांचे कुटुंब सोनारी (ता. उरण, जि. रायगड) येथे उपजीविकेसाठी राहत होते. संशयित आरोपी हरिबा माने व त्यांची आई कमलाबाई शिवाजी माने व मयत विवाहिता अनितास मानपान, सोने आणणे याबाबत वारंवार छळत होते. दिनांक २४ मार्च रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अनिताने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. अनितास उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेलो असता सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी तिला तपासून तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे घेऊन जाण्यास सांगितले असता रस्त्यातच तिची हालचाल बंद झाल्यामुळे आम्ही तिला पुन्हा ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे घेऊन आले असता डॉक्टरांनी तपासुन ती मयत झाल्याचे सांगितले. विवाहित अनिताच्या मृत्यूस तिचा नवरा हरिबा माने व सासु कमळाबाई माने हे दोघे जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
0 Comments