राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना येत्या आठ दिवसांत मार्चअखेर पर्यंतचे मानधन देणार : सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई, ( दि.25 मार्च ) : राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे 28 हजार पात्र मानधनधारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत मार्चअखेर पर्यंतचे मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले की, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी 18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून वारसदार व नव्याने अंतर्भूत झालेल्या काही कलाकारांनाही मानधन अदा होईल. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच राहील असेही श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी राज्यशासनाकडून ही योजना सन 1955 पासून राबविण्यात येते. अलीकडेच या मानधनधारकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत श्रेणीनिहाय (अ श्रेणी रुपये 3150, ब श्रेणी रुपये 2700, क श्रेणी रुपये 2250) मानधन दरमहा अदा करण्यात येते.
0 Comments