सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पुलावर पाणी; ‘हे’ दोन महामार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद
उजनी धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भीमा नदीला पूर येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर-मंगळवेढा व पंढरपूर-मंगळवेढा हे दोन महामार्ग बंद करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली आहे.
तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी पूल पाहणी केली.भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होताना दिसत असुन बेगमपूर पुलावर पाणी येणार आहे. व पंढरपूर सिध्देवाडी येथील माण नदीच्या पात्रात वाढ झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे दोन महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी पावसाने हाहाकार माजविला आहे. मंगळवारी दिवसभरात 59.6 मि.मी., तर बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 78.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात एकूण 138.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीसह मालमत्तेचे नुकसान, जनावरे दगावण्याची तसेच घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मंगळवारी सुरु झालेला पाऊस बुधवार रात्रीपर्यंत सुरुच होता. पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात वाढत होता.
मंगळवेढा तालुक्यातील ,खोमनाल,पाठखल, अकोले, गुंजेगाव,बावची, जिंती, पौट, सलगर खुर्द आदी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले होते. सांगोला तालुक्यालाही या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतातील सकल भागात पाणी साचले आहे. ओढे आणि नाले भरभरुन वाहत आहेत. त्यामुळे शेतातील माती आणि बांध वाहून जाण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत.
अक्कलकोट तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने तालुक्यातील ओढे, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. तालुक्यातील कुरुनूर धरण भरल्याने पाणी खाली सोडण्याची वेळ आली. दुसरीकडे अक्कलकोट शहरातील जुन्या राजवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसला असून राजवाड्याचा बुरुज पावसाने ढासळला आहे. शिरसी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली.
बार्शीतही पावसाचा जोर कायम होता. भोगावती नदी दुथडी भरुन वाहत आहे. तालुक्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. शहरातील अनेक भागांत पाणी साचले आहेे. ग्रामीण भागातही जोरदार पाऊस असल्याने शेती पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ ओढ्याला पाणी आल्याने मार्डी-होनसळ मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. नान्नज मोहितेवाडी गावचा संपर्क तुटला होता. दक्षिण सोलापूर सिंदखेड ते मद्रे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. तीर्थ, दिंडूर, लिंबीचिचोळी या गावांत अनेक घरांची पडझड झाली होती. मोहोळ तालुक्यातील विरवडे ते पाकणी येथील सीना नदीवरील वाहतूक बंद केली होती. पंढरपूर तालुक्यातही पावसाने हाहाकार माजविला होता.
करमाळा तालुक्यातील शेलगाव आणि वरकटणे या गावांत अनेक घरांची पडझड झाली होती. जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांच्या उडीद, मूग, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर फळबागांनाही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सोलापूर शहरात मंगळवार, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झोपडपट्टी, नगर, वसाहतींच्या घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. नगरसेवक मदतीला धावले तरी मनपा प्रशासन सुस्त असल्याची ओरड होती. दरम्यान, दुपारून महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह अधिकार्यांनी नगरसेवकांसह परिस्थितीची पाहणी केली. ‘स्मार्ट सिटी’ची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथके तसेच साहित्य यांची व्यवस्था करावी, आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
वीज पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची आगाऊ माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी ‘दामिनी लाईटनिंग अॅलर्ट’ हे अॅप डाऊनलोड करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 0217-2731012 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी केले आहे.
0 Comments