जत तालुक्यात भीषण दुर्घटना; बांधकामाधीन भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू, दहा जण जखमी
सांगली | प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली.
अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली
आणि त्याखाली दबून सहा भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. वाऱ्याचा वेग वाढल्याने काही भाविकांनी बांधकाम सुरू असलेल्या भिंतीशेजारी आश्रय घेतला होता.
त्याच वेळी शेजारील पत्र्याचे शेड उडून भिंतीवर आदळले. कच्च्या अवस्थेतील भिंत कोसळल्याने अनेक जण तिच्या खाली अडकले.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमी व अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.
सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


0 Comments