आंबेडकर जयंतीनिमित्त सांगोला–दापोली बस सेवेचा शुभारंभ; शेतकरी-पर्यटकांसाठी नवी जीवनवाहिनी
सांगोला (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्य साधत सांगोला–दापोली बस सेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. या नव्या बस सेवेच्या माध्यमातून
सांगोला आणि कोकण यांच्यातील संबंध अधिक दृढ होणार असून शेतकरी व पर्यटकांसाठी मोठी सोय निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दीपकआबा साळुंखे–पाटील यांनी केले.
सांगोला बस स्थानकात शहीद अशोक कामटे संघटना व सोलापूर जिल्हा प्रवासी सेवा संघ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बसचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच मिठाई वाटप करून शुभारंभ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात बस चालक गणेश लवटे, वाहक समाधान बंडगर आणि प्रथम प्रवासी सौ. सपाटे मॅडम यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी एसटी महामंडळाचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पृथ्वीराज पारसे, वाहतूक नियंत्रक जलील शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाजपा किसान सेलचे अध्यक्ष शिवाजीराव (आण्णा) गायकवाड, रेल्वे प्रवासी संघटनेचे ॲड. बबनराव पाटील, तसेच कुमार नरखेडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
शहीद अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे यांनी सांगितले की, या बस सेवेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार
असून भविष्यातही संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, इर्शाद बागवान, हरी बाबर, अमोल बोत्रे, गणेश दौंडे, अनिल तारळकर, प्रा. प्रसाद खडतरे,
राजू बंडगर यांनी प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. दापोली येथेही बसचे स्वागत करण्यात आले तसेच चालक-वाहकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलकंठ शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन मकरंद पाटील यांनी केले तर आभार कुमार नरखेडे यांनी मानले. यावेळी सांगोला आगारातील चालक, वाहक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📦 चौकट : कोकण-सांगोला नातं होणार अधिक घट्ट
कोकण हे आंब्याचे माहेरघर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या बस सेवेचा फायदा आंबा वाहतूक तसेच पर्यटनासाठी होणार आहे.
सांगोला तालुक्यातील शेतकरी डाळिंब, द्राक्ष, आंबा व पेरू उत्पादनात अग्रेसर असून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे या प्रगतीत मोठे योगदान आहे.
या बस सेवेच्या माध्यमातून सांगोला आणि कोकण यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध अधिक दृढ होतील. ही सेवा कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.


0 Comments